नवी मुंबईत विमान घालणार पुन्हा घिरट्या, पावसाचा जोर ओसरला; अपूर्ण सिग्नल चाचणी होणार पूर्ण

पावसामुळे अर्धवट राहिलेली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सिग्नल यंत्रणेची चाचणी आता लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे याच महिन्यात विमान पुन्हा नवी मुंबईत घिरट्या घालणार आहे. १७ जुलै रोजी विमानतळ प्राधिकरणाने नवी मुंबई विमानतळावर बसवलेल्या सिग्नल यंत्रणेची चाचणी सुरू केली होती. ही चाचणी लागोपाठ दोन दिवस होणार होती. मात्र पावसाचा जोर वाढल्यानंतर दुसऱ्या दिवसाची चाचणी थांबवण्यात आली. आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पुन्हा चाचणी घेण्याची तयारी विमानतळ प्राधिकरणाने सुरू केली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम एकूण पाच टप्प्यात होणार आहे. त्यापैकी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम सुमारे ६५ टक्के पूर्ण झाले. दक्षिण आणि उत्तर बाजूला जाणाऱ्या दोन धावपट्ट्यांचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. याच सिग्नल यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी १७ जुलै रोजी विमानतळ प्राधिकरणाच्या दोन विमानांनी नवी मुंबई विमानतळावर घिरट्या घातल्या. या दोन्ही विमानांनी धावपट्टीपासून अत्यंत कमी अंतरावरून धावपट्टीला समांतर उड्डाण केले. पनवेल शहरातही खाली आलेली विमाने पाहण्यासाठी नागरिक इमारतींच्या टेरेसवर आले. जवळून दिसणाऱ्या विमानांचे अनेकांनी व्हिडीओ शूट केले. हेच व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि विमानतळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली. ही चाचणी लागोपाठ दोन दिवस होणार होती. मात्र १८ जुलै रोजी दिवसभर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी होणारी चाचणी १९ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र १९ जुलै रोजीही दिवसभर पावसाचा जोर कमी न झाल्याने विमानतळ प्राधिकरणाने सिग्नल यंत्रणेची चाचणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. आता पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच चाचणी घेण्याची तयारी विमानतळ प्राधिकरणाने सुरू केली आहे.

लवकरच तारीख जाहीर होणार
पावसामुळे अर्धवट राहिलेली सिग्नल चाचणी पूर्ण करण्याची तयारी विमानतळ प्राधिकरणाने सुरू केली आहे. ही चाचणी याच ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. चाचणीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी ती लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. ही अर्धवट चाचणी झाल्यानंतर हा अहवाल सादर केला जाणार आहे. सिग्नल यंत्रणेची चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढील चाचण्या घेण्यात येणार आहेत.