नवी मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये ‘गोलमाल है’, महिलेच्या नावापुढे विद्यार्थिनीचा फोटो

382
प्रतिकात्मक फोटो

महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून त्याची प्रक्रियाही प्रशासकीय पातळीवर सध्या जोरात सुरू आहे. मात्र मतदार याद्यांच्या बाबतीत ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है..’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. महिलेच्या नावापुढे चक्क एका विद्यार्थिनीचा फोटो असून मतदारांच्या नावांमध्येदेखील असंख्य चुका आढळून आल्या आहेत, तर एकाच मतदाराचे छायाचित्र तीन ठिकाणी छापून आल्याने ऐन मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मतदार याद्यांमधील गोलमाल कारभारामुळे बोगस मतदान झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.

23 मार्चला अंतिम यादी
एप्रिल 2020 मध्ये होणाऱया महापालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रभागाच्या मतदार याद्या येत्या 9 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहेत. त्यानंतर या याद्यांवर सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यांची सुनावणी झाल्यानंतर येत्या 23 मार्च रोजी निवडणूक आयोग अंतिम मतदार यादी जाहीर करणार असून दुसऱया दिवशी मतदान केंद्राची यादी जाहीर होणार आहे. अंतिम मतदार याद्यांसाठी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांचा विचार केला जाणार आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील यादी क्रमांक 212 मध्ये मतदार क्रमांक 510 वर शीतल सोळंकी यांचे नाव असून त्यांच्या पुढे एका विद्यार्थिनीचा फोटो टाकण्यात आला आहे. मतदार यादी क्रमांक 215 मध्ये मतदार क्रमांक 580 अक्षय सकपाळ, 582 ज्योती म्हात्रे, 597 सुरक्षा तिवारी या तिघांच्या पुढे एकच छायाचित्र छापण्यात आले आहे. अशाच पद्धतीचा गोंधळ अनेक मतदार याद्यांमध्ये समोर आल्याने सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे.

आरक्षणात कोणताच बदल नाही
प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या सोडतीवर सुमारे 524 सूचना आणि हरकती आल्या होत्या. त्यावर सुनावणी घेऊन सदरचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार काही प्रभागांच्या रचनेमध्ये थोडाफार बदल झाला आहे. प्रभागांच्या आरक्षणात मात्र निवडणूक आयोगाने कोणताही बदल केलेला नाही. मतदार याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केली आहे.

– अनेक याद्यांमध्ये महिला मतदाराच्या नावापुढे विद्यार्थिनीचे फोटो लावण्यात आले असून एकाच यादीत एका मतदाराचे छायाचित्र तीन नावांच्या पुढे पाहायला मिळत आहे.
-गोलमाल असलेल्या या मतदार याद्या दुरुस्त होणार की तशाच राहणार या चिंतेने इच्छुक उमेदवारांना ग्रासले आहे. सर्वांचे लक्ष आता येत्या 9 मार्च रोजी प्रसिद्ध होणाऱया मतदार यादीकडे लागले आहे.
– मुरबाड, जुन्नर, आंबेगाव, आंध्र प्रदेशातील नागरिकांची नावेही येथील मतदार यादीमध्ये यापूर्वी आढळून आली आहेत. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी बोगस आणि दुबार नावे असलेल्या मतदारांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती.
– बेलापूर मतदारसंघात सुमारे 25 हजार दुबार आणि बोगस नावे कमी झाली. मात्र नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येऊनही मतदार याद्यांमधील सावळागोंधळ थांबलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या