शहरात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू झाला असून, विविध देवींच्या मंदिरांत भाविकांकडून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जात आहे. विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातही अनेक देवींची प्राचीन मंदिरे असून, वर्षोनुवर्षे त्याठिकाणी पाद्यपूजा केली जाते. त्यासोबतच दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. नवरात्री विशेष म्हणजे देवीच्या नऊ रूपांच्या पूजेचा सण आहे. या काळात भाविक भक्त उपवास करीत देवीची आराधना करतात. विशेषतः प्राचीन मंदिरांतील वर्षानुवर्षे सुरू असलेली आरास आजही कायम आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले तांबडी जोगेश्वरी, भवानी पेठेतील भवानी माता, चतुः शृंगी माता, कोथरूडची भवानी माता, तळजाई माता यांसह अनेक देवींची मंदिरे फार वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच अरणेश्वरची पद्मावती देवीही प्राचीन आहे. त्याठिकाणावरील प्रत्येक मंदिराला प्राचीन इतिहास असून, भाविक मोठ्या श्रद्धेने आजही विविध सणांसह नवरात्र साजरी करतात. दरम्यान, मागील काही वर्षांपासून सारसबागेसमोर महालक्ष्मीचे मोठे मंदिर उभारले आहे. त्याठिकाणीही आता दरवर्षी नवरात्रीमध्ये उत्सव साजरा केला जातो. पुण्यातील विविध देवींच्या मंदिरांत नवचंडी होम आणि नवरात्रीचे दर्शन हे नऊ दिवस उत्साहात साजरे केले जातात. तसेच नवरात्रोत्सवात नऊ दिवसांत बहुतांश घरात घट बसवून देवीची उपासना केली जाते.
नवरात्रोत्सवात नऊ दिवसांतील नऊ माळा
घरोघरी परडीमध्ये किंवा पत्रावळीवर, ताम्हनामध्ये मातीच्या भांड्यात पंचधान्य उगवले जाते. कलशावर प्रत्येक दिवशी फुलांची एक माळ, अशा नऊ दिवसांच्या नऊ माळा बांधून नवरात्र साजरा केला जातो. सप्तमी, अष्टमीला पापड्या आणि देवीचे दागिने यांचा फुलोरा नैवेद्य दाखवला जातो. नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रूपांमध्ये देवी भाविकांना दर्शन देत असताना वेगवेगळ्या वाहनांवर आरुढ होते. अष्टमीच्या दिवशी देवीला महालक्ष्मीचे स्वरूप मानले आहे.
चतुःशृंगी माता मंदिर चतुः शृंगी देवीचे मंदिर सेनापती बापट रस्त्यावरून पुढे एक ते दीड किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला आहे. मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण असून, पावसामुळे मंदिर परिसरात दोन्ही बाजूंना हिरवाईने डोंगर नटलेले असतात. त्यामुळे परिसर भक्तांना अधिकच प्रभावित करतो. नवरात्रोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे. संपूर्ण मंदिर लाल विटांनी बांधले असून, त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देवीच्या दर्शनासाठी दूरवर रांगा लागल्या जातात.
तांबडी जोगेश्वरी तांबडी जोगेश्वरी हे देवीचे मंदिर जवळपास 300 वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात जागृत देवीची उभी मूर्ती असून, ती ताम्रवर्णीय आहे. त्यामुळे तिला तांबडी जोगेश्वरी असे नाव पडले आहे. त्यासोबतच देवीने ताम्रसुराचा नाश केला म्हणूनसुद्धा तांबडी जोगेश्वरी असे संबोधले जाते. मानाची पहिली देवी म्हणून तांबडी जोगेश्वरीचा उल्लेख केला जातो. गणेशोत्सवात देवीच्या मंडळाला पहिल्या पाच मानाच्या पाच गणपतींमध्ये स्थान आहे. वर्षानुवर्षे लोक देवीची मनोभावे पूजा करतात. घरातील कोणत्याही शुभकार्याची पत्रिका कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी देवीला अर्पण केली जाते.
पुण्यातील नामांकित देवींची प्राचीन मंदिरे
दुर्गादेवी मंदिर – दत्तवाडी परिसरात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक दुर्गादेवीचे मंदिर आहे. मंदिराचा रांगेत असलेला गर्भगृह आणि भव्य मंडप भक्तांना आकर्षित करतो. नवरात्रोत्सवात विविध उपक्रमांसह कार्यक्रमांची रेलचेल असते.
भवानी माता मंदिर- भवानी पेठेतील भवानी मातेचे हे मंदिर प्राचीन असून, मंदिरात नित्य पूजा, अभिषेक आणि आरती नियमितपणे पार पडते. नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्यास प्राधान्य दिले जाते. मंदिरात महापूजा केल्याने इच्छा पूर्ण होते, असे बोलले जाते. वर्षभर देवीच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.