अशी करा घटस्थापना ! लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला दुर्गादेवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या दिवसांत अखंड ज्योत प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. यावर्षी 26 सप्टेंबरला सकाळी 06:28 ते 08:01 पर्यंत कलशाची स्थापना केली जाईल. घटस्थापनेचा एकूण कालावधी 01 तास 33 मिनिटे असेल. याशिवाय अभिजीत मुहूर्तामध्ये घटस्थापना करणेदेखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी सकाळी 11:54 ते दुपारी 12:42 पर्यंत अभिजित मुहूर्त आहे. घटस्थापना करताना काही चुका टाळणे महत्त्वाचे आहे.

देवीच्या पूजेपूर्वी पवित्र कलशाची स्थापना केली जाते. घटस्थापनेमध्ये नियमांची विशेष काळजी घेतली जाते. कलश बसवताना काही चुका टाळणे गरजेचे आहे.

– घटस्थापना करताना कलशाचे तोंड उघडे ठेवू नये. ते झाकून ठेवावे. कलशात तांदूळ भरून त्याच्या मध्यभागी नारळ ठेवावा.

– कलशाची स्थापना चुकीच्या दिशेने करणे टाळा. ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व) ही देवतांची दिशा असून या दिशेला देवीच्या नावाने कलश ठेवावा.

– कलशाजवळच समई प्रज्वलित केली जाते. समईची ज्योत अखंड नऊ दिवस प्रज्वलित ठेवा. अखंड तेवणाऱ्या दिव्याची ज्योत नेहमी आग्नेय कोनात (पूर्व-दक्षिण) ठेवा. पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.

– . देवीच्या पदाजवळ किंवा पूजास्थळाजवळ घाण होऊ देऊ नका. यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. प्रार्थनास्थळासमोर थोडी मोकळी जागा असावी, जिथे बसून ध्यान आणि पठण करता येईल.

– घटस्थापना स्थळाजवळ शौचालय किंवा स्नानगृह नसावे. पूजेच्या जागी कोणतेही कपाट असल्यास ते स्वच्छ आणि व्यवस्थित लावलेले असावे.