
हिंदुस्थानी नौदलाची ताकद वाढवण्याच्या हेतूने केंद्र सरकारने तब्बल 25 हजार कोटींच्या हेलिकॉप्टर निर्मितीचे पाऊल टाकले आहे. या योजनेंतर्गत कराराच्या शर्यतीत टाटा, अदानी, महिंद्रा डिफेन्स सिस्टम आणि भारत फोर्ज या चार हिंदुस्थानी कंपन्या उतरल्या आहेत. 111 हेलिकॉप्टरच्या स्वदेशी निर्मितीसाठी या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. रणनीती भागीदारच्या (स्ट्रटिजिक पार्टनर) रूपात या कंपन्या योजनेमध्ये सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारने स्वदेशी संरक्षण उपकरणांच्या निर्मितीसाठी स्ट्रटिजिक पार्टनरशिप मॉडेलअंतर्गत पहिल्या टप्प्यात 111 हेलिकॉप्टर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या हेलिकॉप्टरची निर्मिती हिंदुस्थानी आणि विदेशी कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून केली जाणार आहे.
सरकारच्या मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार
नौदलाला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेल्या हिंदुस्थानी आणि विदेशी कंपन्यांची नावे डिफेन्स एक्विजिशन कौन्सिलकडे सरकारच्या मंजुरीसाठी सादर करावी लागणार आहेत. ही मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.
95 हेलिकॉप्टर हिंदुस्थानात बनणार
संरक्षण दलांना आवश्यक असलेल्या उपकरणांची निर्मिती स्ट्रटिजिक पार्टनरशिप मॉडेलच्या माध्यमातून हिंदुस्थानातच करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्याच अनुषंगाने 111 पैकी 95 हेलिकॉप्टर हिंदुस्थानच्या भूमीत बनवली जाणार आहेत. योजनेतील सुरुवातीच्या 16 हेलिकॉप्टरची निर्मिती विदेशात केली जाणार आहे.
योजनेंतर्गत स्ट्रटिजिक पार्टनर बनण्यासाठी हिंदुस्थानातील आठ कंपन्यांनी तयारी दाखवली होती. यात सार्वजनिक क्षेत्रातील एका उपक्रमाचाही समावेश होता.
योजनेत बनवली जाणारी हेलिकॉप्टर नौदलाच्या चीता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा घेणार आहेत.
दिवंगत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्वप्रथम स्ट्रटिजिक पार्टनरशिप मॉडेल सादर केले होते. त्यानंतर निर्मला सीतारामन या संरक्षणमंत्री बनल्यानंतर या मॉडेलने आकार घेतला.