
कंगनाला केंद्राकडून सुरक्षा कवच देण्यात आले आहे. परंतु कितीही सुरक्षा कवच दिले तरी तिच्यावर कायदेशीर कारवाई होणार, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
अभिनेत्री कंगना राणावतने शीख समाजाविरुद्ध सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे शीख समाजाने कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर निशाणा साधला आहे. कंगनावर कायदेशीर कारवाई होणारच, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तसेच कायदेशीर कारवाईपासून केंद्राचे सुरक्षा कवचही वाचवू शकत नाही. कंगना राणावतचे आक्षेपार्ह वक्तव्य सुरूच आहे. कधी महात्मा गांधींचा अपमान करत आहे. तर कधी वेगवेगळ्या समाजाला आतंकवादी म्हणून संबोधत आहे. हे आता कोणत्याही समाजाला सहन होणार नाही. शीख समाजाच्या लोकांनी खार पोलीस ठाण्यामध्ये कंगना राणावतविरोधात एफआयआर दाखल केला आहे. निश्चितपणे कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
ज्ञानदेव वानखेडे पुन्हा हायकोर्टात
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे व कुटुंबीयांवर वारंवार आरोप करून बदनामी करत असल्याने त्यांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखावे अशी ज्ञानदेव वानखेडे यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने फेटाळून लावल्याने याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात पुन्हा एकदा धाव घेतली आहे. या याचिकेवर उद्या न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती माधव जामदार यांनी याबाबत निकाल जाहीर करत ज्ञानदेव वानखेडे यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. वानखेडे यांना खासगी आयुष्याविषयी मूलभूत हक्क असला तरी मलिक यांनाही व्यक्त होण्यासाठी घटनेने स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, असे म्हणत वानखेडे यांची मागणी फेटाळली. या निर्णयाला ज्ञानदेव वानखेडे यांनी द्विसदस्यीस खंडपीठासमोर ऍड. दिवाकर राय यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती काथावाला आणि न्यायमूर्ती जाधव यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी उद्या निश्चित केली.
































































