नवाज शरीफांच्या जावयाच्या अटकेवरून राजकीय भूकंप, पाकिस्तानात सैन्याविरोधात पोलिसांनी पुकारले बंड

पाकिस्तानात सैन्य आणि पोलिसांत चांगलीच जुंपली आहे. माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या जावयाला सैन्याने अटक केल्यावरून देशात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सैन्याच्या कारवाईवर सिंध प्रांत पोलिसांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत बंडाचे शस्त्र उपसले आहे. पोलिस दलातील शेकडो वरिष्ठ अधिकाऱयांनी सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला आहे. त्यावर चक्रावलेल्या आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा यांनी कारवाईच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

नवाज शरीफ यांची मुलगी मरियम हिचा पती कॅप्टन मोहम्मद सफदर याला दोन दिवसांपूर्वी कराचीत अटक केली गेली. सैन्याने हॉटेलचा दरवाजा तोडून पतीला ओढत नेल्याचा मरियमचा आरोप आहे. कराची सिंध प्रांतात मोडते. कार्यक्षेत्राच्या मुद्यावरून विभागाचे प्रमुख पोलिस अधिकारी मुश्ताक मेहर व इतर शेकडो वरिष्ठ अधिकाऱयांनी सैन्याच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

सैन्य आधीपासूनच विरोधकांच्या निशाण्यावर

पाकिस्तान सैन्य आधीपासूनच विरोधी पक्षांची संघटना असलेल्या पाकिस्तान डेमोक्रेट फ्रंटच्या (पीडीएम) निशाण्यावर आहे. पीडीएमने गेल्या काही दिवसांत पंजाब प्रांतातील गुजरावाला व कराचीत मोठय़ा रॅली काढल्या. यावेळी सरकारपेक्षा सैन्याला अधिक टार्गेट करण्यात आले. सैन्याच्या मिलिभगतमुळेच सरकार सत्तेवर आल्याचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या