नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्या

765

सोमवारपासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पुरसलगोंदी येथील पोलीस पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्या केली. तर दुसरीकडे कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्येही साहित्याची व शेडची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

मासु पुंगाटी (पोलीस पाटील) व ऋषी मेश्राम (राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते) अशी मृतांची नावं आहेत. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाला नक्षलवाद्यांचा कायम विरोध राहिला. मात्र त्यानंतरही शासन व प्रशासनाने येथे उत्खननाचे काम सुरू केले. या उत्खननाला पुरसलगोंदी येथील पोलीस पाटील मासू पुंगाटी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ऋषी मेश्राम यांनी समर्थन दर्शविले होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्याची करण्यात आल्याची बाब समोर येत आहे. आजपासून नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू झाला आहे.

हा सप्ताह पाळण्यासाठी नक्षलवाद्यांनी गेल्या दोन-तीन दिवसापासून विविध ठिकाणी पत्रके व बॅनर बांधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहशतीला न जुमानता अनेक गावातील आदिवासी नागरिकांनी एकत्र येत नक्षली बॅनर व पत्रकांची होळी करून ‘नक्षलवादी मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर 29 नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या 17 वर्षीय युवकाची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली. त्यानंतर 30 नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या अबुजमाड जंगल परिसरात नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले.

घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले होते. मात्र आज सप्ताहाचा दिवस उजाडताच पूरसलगोंदि येथील दोघांची हत्या तसेच कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील विविध साहित्य व शेडची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. तर झाडे रस्त्यावर टाकून भामरागड-आलापल्ली मार्गही बंद केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या