बार्शीकराचा पत्रप्रपंच! 22 वर्षांमध्ये लिहिली 15 हजार पत्रं

सध्याच्या इंटरनेटच्या युगात मोबाईल आणि सोशल मीडियामुळे कुणाशीही झटपट संवाद साधता येतो. त्यामुळे मित्रमंडळी-नातेवाईकांना हल्ली पुणीही पत्र पाठवत नाही. प्रियजनांच्या खुशालीचे पत्र घेऊन येणारे पोस्टमन काका दिसेनासे झाले आहेत. मात्र बार्शीतील नयुम शेख यांची बात काही औरच आहे. इंटरनेटच्या युगातही पत्र व्यवहार सुरू राहावेत, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. गेल्या 22 वर्षांमध्ये त्यांनी तब्बल 15 हजार पत्रे लिहिली आहेत. त्यांचा हा अनोखा पत्रप्रपंच बार्शीकरांचा चर्चेचा विषय ठरलाय.

नयुम शेख हे 1999 सालापासून पत्रलेखन करतायत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विज्ञान, संशोधन, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱयांना पत्र पाठवून नयुम शेख त्यांचे कौतुक करतात. पत्रलेखनाचा छंद कसा जडला, याबाबत विचारल्यावर नयुम शेख म्हणाले, शहीद कुर्बान हुसेन यांच्या बहीण हलाखीत जीवन जगत होत्या. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी मुख्यमंत्री, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री अशा तब्बल 300 जणांना पत्र लिहिले होते. या पत्र व्यवहारामुळे त्यांना न्याय मिळाला, त्यानंतर मला पत्रलेखनाचा छंद जडला.

मला वाचनाची आवड आहे. रोज सकाळी वृत्तपत्र वाचल्यानंतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱयांची मी यादी तयार करतो. त्यांना आवर्जून पत्र पाठवतो. अनेक जण मलाही पत्र पाठवून आभार व्यक्त करतात. पत्रलेखनामुळे आजवर मी अनेक माणसं जोडली आहेत. पत्रामुळे जो जिव्हाळा निर्माण होतो तो व्हॉट्सअॅपवरील मॅसेजमधून निर्माण होत नाही.
– नयुम शेख

आपली प्रतिक्रिया द्या