एनसीईआरटी म्हणते… मुलांना शाळेत द्वेषभावना का शिकवायची? पाठय़पुस्तकातून बाबरी मशीद हटवली

एनसीईआरटीच्या शालेय पाठय़पुस्तकांतून गुजरात दंगल, बाबरी मशीद विध्वंस आणि रथयात्रेचे संदर्भ वगळण्यात आले आहेत. बाबरी मशिदीची ‘तीन घुमट रचना’ आणि बाबरी मशीद वादाऐवजी ‘विषय’ असा शब्दबदल करण्यात आला आहे. त्यावर हे अभ्यासक्रमाचे भगवेकरण नाही, असा दावा एनसीईआरटीचे संचालक दिनेशप्रसाद सकलानी यांनी केला आहे. हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक निर्माण होऊ नयेत यासाठीच हे बदल आहेत. मुलांना दंगल आणि द्वेषभावना का शिकवायची असा प्रश्न त्यांनी विचारला.

‘शालेय पाठय़पुस्तकांमध्ये दंगलींबद्दल आपण का शिकवावे? आम्हाला हिंसक आणि नैराश्यग्रस्त व्यक्ती नव्हे तर सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत,’ असा खुलासा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक सकलानी यांनी या बदलांविषयी केला. दरवर्षी असे काही बदल केले जातात, त्याबद्दल वाद कशासाठी, अशी विचारणाही त्यांनी केली.

विद्यार्थ्यांनी आक्रमक, हिंसक बनावे, समाजात द्वेष निर्माण करावा किंवा त्यांनी द्वेषाचे बळी बनावे हा शिक्षणाचा उद्देश आहे का? अशा प्रकारे त्यांना का शिकवावे, इतक्या लहान मुलांना आपण दंगलीबद्दल का सांगावे… या गोष्टी त्यांना मोठे झाल्यावरही कळू शकतात, काय घडले आणि का घडले हे त्या मुलांना मोठे झाल्यावर समजून घेऊ दे, आता चाललेला हा वाद निरर्थक आहे, असे सकलानी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

भगवेकरण केल्याचा इन्कार

अभ्यासक्रमातून काही तपशील संदर्भहीन ठरले असतील तर ते बदलायलाच हवेत. यात मला तरी काही भगवेकरण झाल्याचे वाटत नाही. जर आपण भारतीय ज्ञानप्रणालीबद्दल सांगत आहोत, तर ते भगवीकरण कसे असू शकते? मेहरौलीतील लोखंडी खांबाबद्दल सांगतांना त्या काळात भारतीय हे कोणत्याही धातूविज्ञान शास्त्रज्ञापेक्षा पुढे होते, असे म्हटले तर ते भगवेकरण कसे असू शकते? असेही त्यांनी विचारले.

हुमायून, शाहजहान, अकबर, जहांगीर आणि औरंगजेब या मुघल सम्राटांची माहिती देणारा दोन पानांचा तक्ताही पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे.

भाजपची ‘रथयात्रा’, बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेला जातीय हिंसाचार, भाजपशासित राज्यांमधील राष्ट्रपती राजवट, ‘अयोध्येतील घडामोडींबद्दल खेद वाटतो’ हे भाजपचे वक्तव्य पुस्तकातून वगळले.

सर्वोच्च न्यायालयाने  रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला असेल, तर त्याचा आमच्या पाठय़पुस्तकांमध्ये समावेश का करू नये, त्यात काय अडचण आहे? असा सवाल सकलानी यांनी केला.

पाठय़पुस्तकांतील बदल

एनसीईआरटीची नवीन पाठय़पुस्तके अनेक बदल, दुरुस्त्यांसह बाजारात आली आहेत. अनेक संदर्भ, बाबी तर काढून टाकण्यात आल्या आहेत. इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या सुधारित पाठय़पुस्तकात बाबरी मशिदीचा उल्लेख ‘तीन घुमट रचना’ म्हणून केला आहे. त्यात अयोध्या प्रकरण आधीच्या चार ऐवजी दोनच पानांत संपवले आहे आणि आधीच्या आवृत्तीतील तपशील हटवला आहे. वादंग आणि दंगल हा भाग वगळून त्याऐवजी राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर धडय़ाचा रोख केंद्रित आहे.