पाकिस्तानची लोकं प्रेमळ, मोदी सरकार खोटं बोलतंय! शरद पवार

5033

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान हिंदुस्थानविरोधात काड्या करण्यात आणि दर्पोक्ती करण्यात व्यस्त आहे. हिंदुस्थानसह जगभरातील देश पाकिस्तानला भीक घालत नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्तानची प्रशंसा करताना शरद पवार म्हणाले की, तेथे माझे चांगले स्वागत झाले. हिंदुस्थानमधून आलेल्या नागरिकांना ते आपले नातेवाईक समजतात. काही जण पाकिस्तानमधील लोकांवर अन्याय होत असल्याच्या वावड्या उठवत आहेत, मात्र हे राजकीय फायद्यासाठी सुरू आहे, असे म्हणत पवारांनी उल्लेख न करता मोदी सरकार निशाणा साधला. मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, मी पाकिस्तानमध्ये गेल्यावर माझे चांगले स्वागत झाले. पाकिस्तानमधील लोक त्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी हिंदुस्थानमध्ये येऊ शकत नसतील, परंतु हिंदुस्थानमधून आलेल्या लोकांना ते आपले नातेवाईक समजतात. तसेच पाकिस्तानमधील लोकांवर अन्याय होतोय, असे हिंदुस्थानमध्ये बोलले जाते. मात्र हे सर्व खोटं आहे. तेथील परिस्थिती माहिती करून न घेता आपण ही विधाने करतो. हे केवळ राजकीय फायद्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानबाबत विधान करण्याची ही पवारांची पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील उठसूठ काही लोक इतरांना पाकिस्तानमध्ये निघून जा असा सल्ला देतात त्यांना पवारांनी झापले होते. अल्पसंख्यांक समुदायाच्या एखाद्या व्यक्तींना आपले मत व्यक्त केले की त्याला पाकिस्तानमध्ये चालता हो असे बोलले जाते. परंतु हे लोक पाकिस्तान आणि हिंदुस्थानबाबतही अज्ञानी असतात, असे शरद पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या