
सामना ऑनलाईन । नगर
केंद्रात पुन्हा सत्तेवर येण्याची खात्री भाजपला उरलेली नाही. त्यामुळे विरोधकांना संपवण्यासाठी मोदी सरकारने गैरवापर चालवला आहे. ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधीं यांना ‘ऑगस्ट वेस्टलॅण्ड’ प्रकरणात अडकवण्यासाठी मोठे षड्यंत्र सुरू आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोदी सरकारवर तोफ डागली. एका कार्यक्रमानिमित्त येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
माझे नाव मोदी आहे. मी ते करून दाखवणारच अशा भाषेत देशाचे पंतप्रधान विरोधकांना धडा शिकवण्याच्या धमक्या देत आहेत. स्वातंत्र्यानंतर असे पहिल्यांदाच घडत आहे असे सांगून पवार म्हणाले की, सरकार कोणत्या दिशेने चालले आहे हे लक्षात आले पाहिजे. भाजपची ही राजवट बदलली पाहिजे.
विमान खरेदीत गैरप्रकार झाला आहे. त्या बाबतीत एका एजंटाला आम्ही आणले आहे. त्याच्याकडून मिळणारी माहिती जाहीर करणार असून विरोधकांना धडा शिकवू अशा धमक्या पंतप्रधान देत आहेत. हा सत्तेचा अतिरेक आहे. त्यावर लोकसभेत आम्ही सर्व विरोधकांना एकत्र आणू, असे पवार यांनी सांगितले.
‘ऑगस्ट वेस्टलॅण्ड’ प्रकरणात ज्यांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी होईलच, पण त्याचवेळी चौकशीमध्ये जी नावे घेतली जात आहेत ती सत्ताधारीच सांगतात की काय असा प्रश्न पडतो असे ते म्हणाले.
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आठ दिवसांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला ‘लॉलीपॉप’ संबोधले आहे. हे चुकीचे आहे. संबंधित राज्यात सरकारने हा निर्णय घेतला. त्यांना मदत करणे आणि आर्थिक ताकद देण्याऐवजी देशाच्या प्रमुखाने अशी वक्तव्ये करणे योग्य नाही. केंद्र सरकार शेतकऱयांबाबत सहानुभूतीची भूमिका घेत नाही.
– शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
पवारांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे आज नगरमध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग करावे लागले. हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर पवारांचा सीटबेल्ट दरवाजात अडकल्याचे लक्षात आले आणि हा सारा प्रसंग ओढवला. उड्डाणानंतर अवघ्या सात मिनिटांनी पुन्हा लॅण्डिंग करण्यात आल्यामुळे सर्वजण चक्रावून गेले होते. पोलिसांची धावपळ उडाली तर मैदानात खेळण्यासाठी आलेल्या मुलांचीही धांदल उडाली. दरम्यान, पवार सुखरूप असून दरवाजा व्यवस्थित लावल्यानंतर हेलिकॉप्टर पुण्याला रवाना झाले अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.



























































