सत्तेच्या पदराआड लपणार्‍या पळपुट्यांचा विचार करू नका! शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

1010


राज्यभर सुरू असलेल्या गळतीमुळे डॅमेज होत असलेल्या राष्ट्रवादीला कंट्रोल करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. सत्ताधार्‍यांचे काम रोजगार निर्मितीचे असते, मात्र विद्यमान सत्ताधार्‍यांनी कोटय़वधी हातांचे काम हिसकावून घेतले आहे. त्यामुळे हा काळ संघर्षाचा आहे. तो करण्याऐवजी अनेक जण स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेच्या पदराआड लपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या पळपुट्यांची अजिबात चिंता करू नका, जनता त्यांना धडा शिकवणार आहे, असा सल्ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

माजी मंत्री गणेश नाईक भाजपवासी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिलाच मेळावा आज सीवूड येथील गणपतशेठ तांडेल मैदानात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, माझ्या 52 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत मी 27 वर्षे सत्तेच्या बाहेर होतो. पण काम करताना कधीच अडचण आली नाही. उलट विरोधात असतानाही चांगली कामे करता आली.  सरकारला सध्या अनेक आघाडय़ांवर अपयश आले आहे. त्याविरोधात संघर्ष करण्याऐवजी काहींनी पळ काढला आहे. मात्र त्यांचा कोणताही विचार करण्याची गरज नाही. महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचे राज्य आहे. आपली माणसे स्वाभिमानाशी तडजोड करीत नाहीत. त्यामुळे पळपुट्यांची अवस्था वाईट होणार आहे, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, अशोक गावडे, प्रशांत पाटील, बाळासाहेब बेंडे आदी उपस्थित होते.

गणेश नाईक पुन्हा चुकले

2014 च्या निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे निवडून येतील हे कुणालाच वाटले नव्हते. मात्र त्यांनी गणेश नाईकांचा अनपेक्षित पराभव केला. नाईकांच्या चुकांमुळे लोकांनी त्यांना नाकारले. पाच वर्षांत ते सुधारतील असे आपल्याला वाटले होते. मात्र आता पुन्हा नाईक दुसर्‍यांदा चुकले आहेत, अशी टीकाही शरद पवार यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या