अशी वक्तव्य महाराष्ट्रातील शेतकरी कदापी सहन करणार नाही, जयंत पाटील यांचा भाजपला इशारा

खासदार कंगना राणावत यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ”शेतकरी आंदोलन जिथे झाले तिथे मृतदेह लटकत होते. महिलांवर बलात्कार झाले”, असे संतापजनक वक्तव्य कंगनाने केल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तिच्या या वक्तव्यामुळे भाजपवर नाक घासण्याची वेळ आली. राणावत यांचे ते व्यक्तिगत मत असून भाजप त्याच्याशी सहमत नसल्याचे भाजपने जाहीर केले.

दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ”भाजप सरकारने शेतकरीविरोधी तीन काळे कायदे आणले. त्या काळ्या कायद्यांविरोधात शेतकरी वर्गाने मोठे आंदोलन छेडले होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले. भाजपच्या एका खासदाराच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीच्या चाकाखाली चिरडले. एवढ्या मोठ्या लढ्याबाबत चुकीची गोष्ट सांगून भाजपचे नवे खासदार शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. अशी वक्तव्ये महाराष्ट्रातील शेतकरी कदापि सहन करणार नाही”, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील खासदार कंगना राणावत यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत खासदार राणावत यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल अतिशय विधान केले. शेतकरी आंदोलन जिथे झाले तिथे मृतदेह लटकत होते. महिलांवर बलात्कार झाले. भाजपचे नेतृत्व मजबूत नसते तर बांगलादेशसारखी परिस्थिती झाली असती. परदेशी शक्तींनी रचलेला हा एक भयंकर असा कट होता, असे बेलगाम वक्तव्य खासदार राणावत यांनी केले.

भाजपने जबाबदारी झटकली

खासदार कंगना राणावत यांच्या विधानाशी भाजप सहमत नसून त्यांचे ते व्यक्तिगत मत असल्याचे पत्रक भाजपच्या वतीने आज प्रसिद्ध करण्यात आले. पक्षाच्या धोरणात्मक बाबीवर बोलण्याची खासदार कंगना राणावत यांना परवानगी नाही, आणि अशा प्रकारची विधाने करण्यासाठी त्यांची अधिकृत नेमणूकही केलेली नाही, असे भाजपने आपल्या पत्रकात म्हटले आहे. खासदार राणावत यांनी भविष्यात अशा प्रकारचे कोणतेही विधान करू नये, अशी तंबीही भाजपने दिली आहे