
‘कुस्ती मारणाऱया पैलवानाने दंड थोपटण्याची परंपरा आहे. जिंकून आलेल्या पैलवानाला तेलाने मसाज केला म्हणून मसाजवाल्याने दंड थोपटण्याची परंपरा नाही. दंड थोपटण्याची एवढीच खुमखुमी असेल, तर 2024च्या निवडणुकीत तुम्ही स्वतः उतरा. तिसऱयांदा तुम्हाला चारीमुंडय़ा चीत नाही केले तर पहिलवान भारत भालकेंचे नाव लावणार नाही,’ असे खुले आव्हान भगीरथ भालके यांनी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांना दिले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले होते. यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांनी दंड थोपटून विजयाचा जल्लोष साजरा केला होता. यावरूनच भगीरथ भालके यांनी परिचारक यांना हे आव्हान दिले आहे.
पंढरपूरचे राजकारण आणि दंड थोपटणे यालाही एक राजकीय इतिहास आहे. 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ पाटील यांना दिवंगत सुधाकर परिचारक यांनी पराभूत केले. राजाभाऊ पाटील हे माजी आमदार औदुंबर पाटील यांचे चिरंजीव होते. 1995च्या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली. या निवडणुकीत परिचारक यांनी पाटील यांचा पराभव केला होता. निकालानंतर परिचारक यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि ‘साहेब, मी जिंकून आलो,’ हे सांगताना दंड थोपटले होते.
परिचारक यांच्या या कृतीची भारत भालके यांच्या मनात सल होती. कारण भालके हे औदुंबर पाटील यांच्या विठ्ठल परिवाराचे सदस्य होते. या बदल्याच्या संधीची ते वाट पाहत होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुधाकर परिचारक व भारत भालके हे आमनेसामने आले. या अटीतटीच्या निवडणुकीत भालके यांनी परिचारक यांचा पराभव करीत विजयाची बाजी मारली. निवडणूक निकालानंतर भालके यांची विजयी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात पोहोचली. भालके महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन आणि पुष्पहार घालण्यासाठी पुतळ्याच्या चबुतऱयावर चढले. महाराजांना अभिवादन केल्यानंतर आमदार भालके यांनी ‘औदुंबर पाटील, यशवंत पाटील आणि राजाभाऊ पाटील यांच्या पराभवाचा हा वचपा आहे,’ असे सांगत दंड थोपटले होते.
त्याचीच पुनरावृत्ती कालच्या निवडणूक निकालानंतर पाहायला मिळाली. भाजपकडून समाधान आवताडे, तर राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे या निवडणूक रिंगणात होते. अतिशय अटीतटीच्या या निवडणुकीत आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला. या निवडणूक निकालानंतर आमदार समाधान आवताडे यांची विजयी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. महाराजांना पुष्पहार आणि अभिवादन केल्यानंतर आमदार परिचारक यांनी दंड थोपटले.
आमदार परिचारक यांच्या दंड थोपटण्यामागे स्वर्गीय सुधाकर परिचारक यांच्या पराभवानंतर भालके यांनी दंड थोपटल्याच्या त्या कृतीचा राग होता. त्याशिवाय 2014च्या निवडणुकीत स्वतः प्रशांत परिचारक यांनादेखील भारत भालके यांनी पराभूत केले होते. त्यामुळे आमदार परिचारक यांनी दंड थोपटले. त्यामुळे भालके यांनी परिचारक यांना आव्हान दिले आहे.
…तर भारत भालके यांचे नाव लावणार नाही!
‘भारत भालके हयात होते तोपर्यंत परिचारक कुटुंबाने दंड थोपटणे तर दूरच, साधा हात वर करण्याचे धाडस केले नाही. त्यांच्या पश्चात दंड थोपटणे हे मर्दुमकीचे लक्षण नाही. मुळात दंड हे मैदान गाजवून आलेल्या पैलवानाने थोपटायचे असतात. जिंकून आलेल्या पैलवानाला तेलाने मसाज केला म्हणून मालीशवाल्याला दंड थोपटण्याचा अधिकार नाही. दंड थोपटण्याची एवढीच खुमखुमी असेल, तर 2024च्या निवडणूक रिंगणात उतरा. तुम्हाला तिसऱयांदा पराभवाची धूळ चारली नाही, तर भारत भालके यांचे नाव लावणार नाही,’ अशा शब्दांत भगीरथ भालके यांनी आमदार परिचारक यांना आव्हान दिले आहे.


























































