राष्ट्रवादीत फूट नाही, मग पक्ष आणि चिन्हाचा वाद कसा! शरद पवारांच्या वतीने वकिलांचा युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्तेसाठी अजित पवार यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्ष संघटनेवर ताबा हवाय. त्यासाठीच त्यांच्या गटाकडून पक्षात वाद असल्याचा कट रचला गेला आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडलीच नाही, मग पक्षाचे नाव आणि चिन्हावरून वाद कसा निर्माण होतो. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू कार्यवाही चुकीची आहे, असा जोरदार युक्तीवाद राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वतीने अॅड. देवदत्त कामत यांनी आज निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान केला.

मिंधे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आणि घडयाळ  या या निवडणूक चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गट आणि मुळ शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला नोटीस बजावून पक्ष आणि चिन्हासाठीची सुनावणी सुरू केली आहे. आयोगाच्या कार्यालयात आज यासंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान शरद पवार यांच्यावतीने युक्तीवाद करताना अॅड. देवदत्त कामत यांनी राष्ट्रवादी पक्षासंदर्भात अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेली प्रतिज्ञापत्र बोगस आणि कागदपत्र चुकीची आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच अजित पवार यांनी 30 जून 2023 ला दाखल केलेल्या एका याचिकेच्या आधारे पक्षात फुट पडल्याचे मानून पक्षाच नाव आणि चिन्हासंदर्भात सुरू केलेली कार्यवाही चुकीची असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी आता बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.

कारवाई टाळण्यासाठी फूट पडल्याचा प्रचार

केवळ सत्तेसाठी अजित पवार गट भाजपबरोबर गेला. अजित पवारांसोबतच्या आमदारांवरील अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रवादीत फूट पडल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडे लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत आहे, असे अॅड. देवदत्त कामत यांनी नमूद केले.

30 जूनपूर्वी कोणताच वाद नव्हता – अभिषेक मनु सिंघवी

एक याचिका दाखल करुन कोणताही वाद निर्माण करता येत नाही. अजित पवार गटाकडून 30 जून 2023 ला पक्ष आणि चिन्हासाठी याचिका दाखल केली. 30 जूनपूर्वी पक्षात कोणताच वाद नव्हता. जर वाद नव्हता तर पक्षात फुट पडल्याचा मुद्या येतोच कुठून, निवडणूक आयोग अनुच्छेद 15 अंतर्गत कशी कार्यवाही करू शकते? हाच मुद्या आयोगापुढे झालेल्या सुनावणीदरम्यान मांडण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 2023 मध्ये पहिल्यांदाच त्यांची 2018 मध्ये अध्यक्ष म्हणून झालेली निवड चुकीची असल्याचा आरोप अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून करण्यात आला आहे. वास्तविक 2018 मध्ये शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड करताना मांडलेल्या प्रस्तावास अजित पवार यांनीच अनुमोदन दिले होते. दिल्लीत पार पडलेल्या पक्षाच्या अधिवेशनात शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड करताना प्रस्तावक प्रफुल्ल पटेल होते. ही निवडणूक प्रक्रिया टी मास्टर यांच्या अधिकाराखाली पार पडली. यानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती माध्यमांना दिली होती. प्रफुल पटेल यांनीच दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यालयांना आणि पदाधिकार्यांना पाठवले होत. यासंदर्भातील घटनाक्रमच अॅड. देवदत्त कामत यांनी आयोगापुढे झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितला.

अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षविस्ताराच्या कामात कुठलाही हातभार नव्हता. त्यांना केवळ सत्तेसाठी पक्षाचा ताबा हवाय. पक्ष संघटनेत त्यांच्याकडे कुठलीही जबाबदारी नव्हती. ते फक्त राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते, असे कामत यांनी नमूद केले.