
सामना ऑनलाईन । मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्यांवरून प्रचंड नाराजी आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ध्येयधोरणे प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी 31 प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. पण प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या जिल्हा व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या होत नसल्याबद्दल पक्षाच्या नेत्यांना जाब विचारला जात आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही त्याला अपवाद नाही, पण सध्याच्या दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अजिबात उत्साह नाही. कारण जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. मुंबईतल्या सहा जिल्हाध्यक्षांपैकी फक्त दोनच जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. पूर्व उपनगरात संजय पाटील व पश्चिम उपनगरात अजित रावराणे यांची नियुक्ती झाली, पण उर्वरित चार जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. जिल्हाध्यक्षांपाठोपाठ तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या होतात, पण त्याही रखडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पूर्वी जिल्हाध्यक्ष निवडताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होत. पण आता ही प्रथा मोडीत निघत चालल्याची खंत राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. पक्षाचे सध्या 41 आमदार असून पक्ष प्रवक्त्यांची संख्या 31 वर नेऊन ठेवली आहे याकडेही कार्यकर्ते लक्ष वेधतात.






























































