राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे जनतेला आवाहन; सहकार्य करा, संकटाला धैर्यानं सामोर जाऊ!

‘कोरोनाचं संकट यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक मोठं आहे. तेव्हा वर्तमान परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागेल. सर्व घटकांनी राज्य सरकारला सहकार्य करावे’, असं कळकळीचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर व्हिडीओ अपलोडकरून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ऑपरेशन झाल्यानंतर ते प्रथमच ते मीडियासमोर आले आणि त्यांनी जनतेला आवाहन केलं. राज्यातील कोरोना परिस्थितीची आकडेवारी त्यांनी दिली. इतकंच नाही तर राज्यातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स हे ज्या पद्धतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लढत आहे त्याचं कौतुक केलं.

‘सरकारने बंधन आणल्याने शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योग सर्वांचं मोठं नुकसान होत असताना नाराजी आहे. यासगळ्यातून मार्ग काढत आपल्याला पुढे जायचे असेल तर आपल्याला वर्तमान परिस्थितीला धैर्याने सामोरं जावं लागेल. वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. सर्व घटकांनी राज्य सरकारला सहकार्य करावे’, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ‘सध्याच्या गंभीर परिस्थितीत राजकारण वैगरे सर्व गोष्टी दूर सारून संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दाखवत यावर विजय मिळवू. लोकांना या संकटातून दूर करू’ असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यातील एकूण परिस्थितीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच केंद्र आणि राज्य मिळून या परिस्थितीशी एकत्र लढत असल्याचंही ते म्हणाले. केंद्र सरकारचं सहकार्य मिळत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या