गृहविभाग वामन म्हात्रेंना वाचवण्याचा प्रयत्न करतंय? एफआयआर गायब झाल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा सवाल

बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचारानंतर उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱया पत्रकार महिलेचा मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विनयभंग केला. त्या विरोधात महिला पत्रकाराने विनयभंगाची तक्रार दाखल केली. मात्र म्हात्रेंवरील एफआयआर पोलिसांच्या सीसीटीएनएस संकेतस्थळावरून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सत्ताधारी मिंधे सरकारला फटकारले आहे. तसेच गृहमंत्रालय वामन म्हात्रेंना वाचवण्याचा प्रयत्न करतेय का ? असा सवाल देखील केला आहे.

”शिंदे गटाचा नेता वामन म्हात्रे याने महिला पत्रकाराचा विनयभंग केल्यावर गुन्हा दाखल झाला खरा, परंतु 5 दिवसातच महाराष्ट्र पोलिसांच्या सीसीटीएनएस संकेतस्थळावरून वामन म्हात्रें विरोधातील ‘एफआयआर’ गायब झाला आहे. शिंदे गटाच्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न गृहविभाग करतंय का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.

मुलींवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी 20 ऑगस्टला नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले. त्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दै. ‘सकाळ’च्या पत्रकार महिलेला मिंधे गटाच्या वामन म्हात्रे यांनी, ‘तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ असे अपमानास्पद, अर्वाच्य शब्द वापरले. याप्रकरणी महिला पत्रकाराने तक्रार केल्यानंतर 36 तासांनी पोलिसांनी म्हात्रे यांच्याविरुद्ध विनयभंग व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.