मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. यावरून राज्य सरकारला कुठलेही तारतम्य उरलेले नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली.
मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तेव्हा शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात कुठेही पुतळा उभारायचा असेल तर महाराष्ट्र सरकारची परवानगी लागते. तिथे स्वतः पंतप्रधान गेले होते. यात आम्ही कुठलेही राजकारण आणत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रांझ्याच्या पाटलाने एका मुलीवर अत्याचार केले होते. ही तक्रार जेव्हा शिवाजी महाराजांकडे आली तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचे दोन्ही हात, पाय कापले होते. आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांबाबात आपली निती काय आहे हे संपूर्ण जनतेला त्यांनी दाखवून दिले. एका भगिनीला त्रास दिला त्यावर त्यांनी सक्त निर्णय घेतला. असा निर्णय घेणाऱ्या राजाची प्रतिकृती समुद्रावर तयार केली. आणि ती करण्यात जो भ्रष्टाचार झाला, त्यामुळे आज ती मूर्ती उद्ध्वस्त झाली. ज्या ठिकाणी पंतप्रधान स्वतः जाऊन आले, त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले, त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे, असे पवार म्हणाले. तसेच भ्रष्टाचाराविरोधात कुठलीही भूमिका घेऊ नये याचे तारतम्यही या सरकारला राहिलेले नाही. त्यामुळे आमची भूमिका काय आहे? यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतल्याचे शरद पवार म्हणाले.