नगर – राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या राड्यामुळे पदाधिकार्‍यांसह 30 जणांवर गुन्हा दाखल

878

नगर शहरातील नंदनवन लॉनसमोर राष्ट्रवादीच्या दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नगर येथील मेळाव्यानंतर ही घटना घडली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, आपसात तडजोड होऊन प्रकरण मिटल्यानंतर कोतवाली पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला. या आरोपींमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर, किरण काळे, सुरेश बनसोडे, बाबा गाडळकर यांच्यासह सुमारे 30 जणांचा समावेश आहे.

नंदनवन लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांचे समर्थक व माजी महापौर अभिषेक कळमकर- किरण काळे यांच्यात धक्काबुक्की झाली. कळमकर व काळे यांना जगताप समर्थकांनी मारहाण केल्याचा दावा दोघांनी केला. त्यामुळे दोघांनीही कोतवाली पोलीस ठाणे गाठून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाल्यानंतर माजी आमदार दादाभाऊ कळमकर व आमदार संग्राम जगताप या दोघांनीही पोलीस ठाणे गाठले. दोघांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला आणि प्रकरण मिटवले.

दरम्यान, हा राडा आणि गोंधळबाजीची दखल घेत कोतवाली पोलिसांनी स्वत:हून फिर्याद दाखल केली. बेकायदा जमाव करून शिवीगाळ, दमदाटी व आपसात मारहाण केल्यावरून संतोष लांडे, वैभव वाघ, बाबा गाडळकर, सुरेश बनसोडे, तौसिफ शेख, संतोष ढाकणे, अभिषेक कळमकर, किरण काळे, जॉय लोखंडेसह 30 जणांवर पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद लहाडे यांच्या फिर्यादीनुसार भा. द. वि. कलम 143, 147, 149, 160, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या