
महानंद डेअरीचे दूध वितरण कमालीचे घटल्याने आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. त्या पार्श्वभूमीवर डेअरीचे संपूर्ण संचालन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे (एनडीडीबी) देण्याचे निर्देश दुग्धविकास मंत्र्यांनी दिले होते. त्याला एनडीडीबीनेही सकारात्मक प्रतिसाद देत डेअरीचा अभ्यास करण्यासाठी एक टीम पाठवली होती. त्याला एक महिना उलटल्यानंतरही त्यांच्याकडून कोणताच निर्णय आलेला नाही. यावरून एनडीडीबीने महानंद डेअरी चालवायला घेण्याबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
महानंदच्या दैनंदिन दुधाचे वितरण एक लाख लिटरच्या खाली आले आहे. त्यामुळे प्रतिलिटरमागे होणाऱ्या खर्चात मोठी वाढ होऊन तोटय़ात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नियमित पगार करणे, पुरवठादारांची बिले चुकती करणे कठीण झाले आहे. त्यामुळेच डेअरी चालवण्याचे काम एनडीडीबीला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याबाबत डेअरी, सरकार आणि एनडीडीबी यांच्यात चर्चा झाली आहे. त्यानंतर डेअरीने एनडीडीबीला स्मरणपत्रही दिले आहे. त्यानंतरही एनडीडीबीकडून ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.


























































