मांजरा नदीच्या पाण्यातून 50 जणांची एनडीआरएफकडून सुटका

एनडीआरएफच्या पथकाने सारसा येथील 50 जणांची पुरातून सुखरूपपणे सुटका केली. सारसा टाकळगाव ,देवळा येथून वाहणाऱ्या मांजरा नदीपात्रात मागील काही दिवसापासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे व मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याची आवक चालु होती. त्या पाण्याने वाकडी, का. बोरगाव,देवळा, वांजरखेड ,साई हे सर्व बंधारे ओसंडून वाहत होते. मागील काही दिवसात मांजरा धरण 100 टक्के भरल्यामुळे धरणातून मांजरा नदीपात्रात पाणी सोडले. त्यामुळे नदीपत्राजवळील गावांना सावधानतेचा इशारा दिला होता. सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. त्यातच लहान मोठ्या नद्या नाल्यांचे पाणी नदी पात्रात मिसळून नदीने रौद्र रूप धारण केले.

अचानक झालेला पाऊस व रात्रीची वेळ यामुळे सारसा येथील शेतकरी सचिन पारिक त्यांचे कुटुंब स्वतःच्या शेतात गुरांसह वास्तवास आहेत. शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील सालगडी असे एकूण 50 जण कुटुंबियांसोबत पाण्यात अडकले होते. गावकऱ्यांनी तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती दिली. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने सर्वाना सुखरूप बाहेर काढले आहे. जनावरांना सोडून दिल्यामुळे जनावरे बेपत्ता आहेत. नदीच्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . पाणी कमी होताच शेतीचे व पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या