प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनची तीनपट व्यवस्था करा – राजेश क्षीरसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेत प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांसह ऑक्सिजनची तीनपट व्यवस्था करावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी पाच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी क्षीरसागर बोलत होते. बालकांसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजना व नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी खर्च करताना प्रथम प्राधान्य कोविडविषयक बाबींबरोबरच जनहिताच्या कामांनाही द्यावे. नंदुरबार येथील कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना कराव्या. नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढ रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करावी. कोरोना रुग्णांकडून वाढीव बिल आकारणी झाली असेल तर बिलांचे पुन्हा लेखापरिक्षण करून त्यांना कोरोनाविषयक वैद्यकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जलज शर्मा, मनीषा खत्री, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, राजेंद्र क्षीरसागर, वान्मथी सी., अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपायुक्त प्रशांत पोतदार, उपायुक्त गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात उद्यान स्मारक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात उद्यान स्मारक उभे करावे, त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, व्यंगचित्र केंद्र, ओपन जीम, कलादालन, जिल्ह्यातील प्रसिद्ध खाद्य पदार्थांचे स्टॉल यांचा समावेश असावा. हे विकासकाम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.