ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल मानद उपाधी, संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला हिंदुस्थानी सैन्यात पदोन्नती मिळाली आहे. त्याची लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या एका समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी त्याला मानद उपाधी प्रदान केली. यावेळी नीरज चोप्रा याची आई सरोज देवी, वडील सतीश चोप्रा, काका भीम चोप्रा आणि पत्नी हिमानी मोर हे देखील उपस्थित होते.

नीरज चोप्रा २६ ऑगस्ट २०१६ रोजी नायब सुभेदार म्हणून सैन्यात रुजू झाला. २०२१ मध्ये त्याला सुभेदार म्हणून बढती देण्यात आली. टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला सैन्याने परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले. २०२२ मध्ये नीरज याला सुभेदार मेजर म्हणून बढती देण्यात आली.

दरम्यान, नीरज चोप्रा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भालाफेकपटू आहे. त्याने सलग दोन ऑलिंपिक खेळांमध्ये देशासाठी पदके जिंकली आहेत. नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. याव्यतिरिक्त, त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ यासारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये हिंदुस्थानसाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.