ऑलिम्पिकपूर्वीच नीरजचा ‘सुवर्ण’ वेध, पावो नूरमी स्पर्धेत केली दमदार कामगिरी

हिंदुस्थानचा ‘गोल्डनबॉय’ भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी पुन्हा एकदा सुवर्णपदकावर नाव कोरीत आपण आता दुखापतीतून सावरलो असल्याचा इशारा प्रतिस्पर्धी खेळाडूंना दिला आहे. फिनलॅण्डमधील पावो नूरमी क्रीडा स्पर्धेत त्याने 85.97 मीटर भालाफेक करीत प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केलाय.

नीरज चोप्रा 2023 मध्ये या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. त्याआधी 2022 च्या स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, मात्र यंदा फिनलॅण्डमध्ये झालेल्या पावो नूरमी क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने 85.97 मीटर भाला फेकत अखेर सुवर्णपदकावर नाव कोरले. नीरजच्या नंतर त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या यजमान फिनलॅण्डच्या टोनी केरानेन याने 84.19 मीटर दूर भाला फेकला होता. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फिनलॅण्डच्याच ओलिवयर हेलांडरने 83.96 मीटर भाला फेकत कास्यपदक जिंकले. नीरज चोप्राने पहिल्या फेरीत 83.62 मी., दुसऱया फेरीत 83.45 मी., तिसऱया फेरीत 85.97 मी., चौथ्या फेरीत 82.21 मी. भालाफेक केली. पाचव्या फेरीत त्याचा फाऊल झाला, तर सहाव्या फेरीत त्याचा भाला 82.97 मीटर इतक्याच अंतरावर जाऊन पडला.

नीरजची 90 मीटरची प्रतीक्षा

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकत हिंदुस्थानला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले होते. ऑलिम्पिकनंतर नीरजने काही स्पर्धा जिंकल्या, पण त्याला टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीपर्यंत पोहोचता आलेले नाही. नीरजने मायदेशात 89.94 मीटर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम केलेला आहे, मात्र त्याला अद्यापि 90 मीटर अंतरापर्यंत पोहाचता आलेले नाही. नीरज चोप्राने हा टप्पा ओलांडण्याचे लक्ष ठेवले आहे, परंतु खांदादुखीमुळे त्याला त्यात अडथळा येत आहे. जर्मनीचा युवा भालाफेकपटू मॅक्स डेहनिंगने हॉल येथे झालेल्या स्पर्धेत 90.20 मीटर भाला फेकून विक्रम नोंदवला होता. हा मॅक्सही फिनलॅण्डमधील स्पर्धेत होता, मात्र त्याला पहिल्या तीनमध्येही स्थान मिळविता आले नाही. आता 26 जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे. नीरज चोप्राला ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक राखण्यासाठी 90 मीटर भालाफेक करण्याचे उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवले आहे.