नीट पीजी वेळापत्रकानुसारच! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे एनबीईएमएसचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पीजी 2022 परीक्षा स्थगित करण्याच्या मागणीसाठी काही विद्यार्थ्यांनी ट्विटरवर आंदोलन सुरू केले असतानाच ही परीक्षा 9 जुलैपर्यंत स्थगित केल्याचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विद्यार्थी -पालकांचा गोंधळ उडाला आहे. मात्र नीट पीजी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असून विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (एनबीईएमएस) केले आहे.

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट फॉर पोस्टग्रॅज्युएट (नीट पीजी) परीक्षेसंदर्भात सध्या सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात आहेत. 9 जुलैपर्यंत ही परीक्षा होणार नाही, असे या पत्रकात म्हटले आहे. मात्र हे परिपत्रक बोगस असल्याचे एनबीईएमएसने स्पष्ट केले असून विद्यार्थ्यांसाठी काही सूचनाही जारी केल्या आहेत. एनबीईएमएसच्या https://natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवरून परीक्षा एजन्सी महत्त्वाचे निर्णय जाहीर करीत असते. नीट पीजी 2022 ही परीक्षा 21 मे रोजी होणार असून नियोजित वेळापत्रकात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी वेबसाइटवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एनबीईएमएसच्या वेबसाईटवरून प्रकाशित होणाऱया प्रत्येक पत्रकावर एक क्यूआर कोड दिलेला असतो. जुलै 2020 नंतर क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. क्यूआर कोड स्कॅन करून विद्यार्थी वेबसाइटवरील पत्रकाची सत्यता पडताळू शकतात. तसेच नीट परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला असून काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाइन क्रमांक – 011-45593000.