
नेपाळच्या महापुरात बेपत्ता झालेल्या महाराष्ट्रातील 67 पर्यटकांचा अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आज केंद्र सरकारचे विशेष पथकही अशा बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी काठमांडूला पोहोचले. याशिवाय महाराष्ट्रातील 262 पर्यटक नेपाळ आणि चीनच्या हद्दीत अडकून पडले असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
अद्यापपर्यंत संपर्कही झाला नाही अशा नागरिकांचा शोध घेण्यासाठी काठमांडूला पोहोचलेल्या केंद्राच्या पथकाने नेपाळमधील राजदूतांची भेट घेतली. यावेळी माहितीची देवाणघेवाण करतानाच अडकलेल्या नागरिकांना पुन्हा हिंदुस्थानात परत नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा निर्धार केला गेला. त्यांचा हिंदुस्थानपर्यंतचा प्रवास सुखरूप व्हावा या दिशेनेही संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या जात आहेत.
रिचा टूर्सच्या 60 पर्यटकांचा संपर्कच नाही
रिचा टूर्समार्फत नेपाळला गेलेल्या 60 नागरिकांचा आजही कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. आणखी 7 नागरिकांची नोंद झाली असून त्यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते नागरिक नेमके कुठे आहेत याची माहिती नेपाळ प्रशासनाकडून मिळवली जात आहे.
नेपाळ महाप्रलयातील मृतांचा आकडा 955 वर
नेपाळच्या महाप्रलयातील मृतांचा आकडा 955 वर पोहोचला असून ओळख न पटलेल्या मृतदेहांचे डीएनए नमुने संकलित करून दफन करण्यात येत आहेत. एकटय़ा नेपाळमध्येच 939 जणांचा मृत्यू झाला असून तिबेटमध्ये 16 जण दगावले आहेत. याशिवाय सुमारे 4,200 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती नेपाळ सरकारने दिली असून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
चीनने फेटाळले नेपाळचे आरोप
चीनने ग्लेशियर फुटल्यासंदर्भातील माहिती वेळेत न दिल्याचा आरोप नेपाळने केला होता. चीनने तो आरोप फेटाळत उत्तर दिले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळला खडे बोल सुनावताना म्हटले की, चीनच्या हवामान विभागाने 26 ऑगस्टच्या महाप्रलयाच्या 12 दिवसांपूर्वीच नेपाळला पाऊस, भूस्खलन आणि अचानक येणाऱ्या पुरासंदर्भात इशारा ईमेलद्वारे पाठविला होता.
डीएनए प्रोफाईल पाठविण्याचे आवाहन
नेपाळ सरकारने बेपत्ता लोकांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना डीएनए नमुने मागितले आहेत. परदेशातील नागरिकांनी आपल्या मायदेशी डीएनए प्रोफायलिंग करून संबंधित अहवाल नेपाळ पोलिसांना ईमेलद्वारे पाठविण्यास सांगतले आहे. नेपाळमधील बचाव कार्यात हिंदुस्थानची फॉरेन्सिक पथके तैनात असून डीएनए तपासणीत हे पथक मदत करणार आहे. हिंदुस्थानने अशी 19 पथके पाठवली आहेत.






























































