अगला स्थानक ‘इडली, डोसा, कांदेपोहे’

स्थानक प्रबंधकांचे केवळ कारवाईच्याच उद्घोषणा

रेल्वे स्थानकांवर बाहेरील पदार्थ विकण्यास मनाई आहे. तशा सूचना नेहमीच लोकलमध्ये देण्यात येतात. मात्र मध्य रेल्वेमार्गावरील नेरळ स्थानक याला अपवाद आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या स्थानकावर व्यावसायिकांनी अक्षरशः कब्जाच केला असून ‘इडली, डोसा, कांदेपोह्यां’च्या ठेलेवाल्यांमुळे प्रवाशांना चालणेही कठीण झाले आहे. याविरोधात अनेकदा आवाज उठवूनही स्थानक प्रबंधक केवळ कारवाईच्याच ‘उद्घोषणा’ करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकातून माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी नॅरोगेज मार्ग सुरू होतो. पर्यटनस्थळ असल्याने नेरळ येथे लाखो पर्यटक लोकल गाडीने नेरळ येथे येतात. त्यामुळे नेरळ स्थानकात कायम स्वच्छता ठेवली जात असताना नेरळ रेल्वे स्थानकात प्रशासनाच्या आशीर्वादाने बाहेरील खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री केली जात आहेत. इडली, कांदापोहे, डोसा तसेच भेळचा व्यवसाय केला जात आहे.

पर्यटक तसेच प्रवासी यांना सुविधा देण्यासाठी नेरळ स्थानकात दोन कॅण्टीन आहेत. त्यात मध्य रेल्वेकडून बाहेरील पदार्थही विकण्यास बंदी असल्याची उद्घोषणा रेल्वेकडून केली जात असते. असे असताना नेरळ रेल्वे स्थानकात परप्रांतीय विक्रेते व्यवसाय करतात. विशेष म्हणजे येथे जेमतेम 30 मीटर अंतरावर रेल्वे सुरक्षा दलाचे, नेरळ स्टेशन प्रबंधक आणि रेल्वे पोलीस यांची कार्यालये आहेत. मिनी ट्रेनचे स्थानक प्रबंधक यांचे कार्यालय आहे. नेरळ स्थानकावर बाहेरील पदार्थ विकण्यास बंदी आहे. असे कोणी करत असेल तर तत्काळ कारवाई केली जाईल.
– आर. एस. मीना,
स्थानक प्रबंधक.

विषबाधा झाल्यास कोण जबाबदार?

बाहेरील खाद्यपदार्थ रेल्वे परिसरात विकत घेऊन खाऊ नये, अशी केवळ उद्घोषणा ऐकायची का? नेरळ स्थानकात दररोज बाहेरचे उडपी अनधिकृत व्यवसाय करीत असतात. मात्र त्यांना कोणताही कायदा नाही. जर अन्नातून विषबाधा झाली तर त्यावेळी पोलीस कोणावर कारवाई करणार, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर व भगवान चव्हाण यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या