नेदरलॅण्डमध्ये ट्राममधील प्रवाशांवर गोळीबार तीन ठार

सामना ऑनलाईन। युट्रेक्ट

न्यूझीलंडमधील अलनूर आणि लिनवुड या दोन ठिकाणी दोन मशिदींत एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार करून 50 जणांचे जीव घेतल्याची घटना ताजी असतानाच त्याचीच थरारक पुनरावृत्ती सोमवारी नेदरलॅण्ड या युरोपीय देशात घडली. युट्रेक्ट या शहरात एका बंदूकधारी हल्लेखोराने सकाळी 11.45 वाजता ट्राममधून प्रवास करणाऱया प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात तीन जण ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत.

गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाला असून तो तुर्की असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात शोधासाठी गोकमॅन तनीस (37 ) या इसमाचे छायाचित्र जारी केले आहे. नेदरलॅण्डचे पंतप्रधान मार्करुट यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे, तर युट्रेक्ट शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

ट्राममधील प्रवाशांवरील या गोळीबारानंतर युट्रेक्ट शहरात हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळे, मशिदी आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच आसपासच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. गोळीबारानंतर ट्रामची वाहतूक थांबवण्यात आली असून तीन ट्रॉमा हेलिकॉप्टर्स घटनास्थळी तैनात करण्यात आली.

युट्रेक्ट शहराच्या आणखी काही भागातही गोळीबार झाल्याची माहिती दहशतवादीविरोधी फोर्सच्या प्रमुखांनी दिली आहे. त्यामुळे सर्वत्र घबराट आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असल्याने शाळा, धार्मिक संस्था आणि सरकारी कार्यालयांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.