दह्यासोबत कधीही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दह्याला पूर्णान्न किंवा पूर्ण आहार म्हणतात, कारण दह्यामध्ये जीवनसत्त्वे, मिनरल्स, प्रथिने आणि फॅट असल्यामुळे आरोग्यासाठी दही खाणे फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, तोंडाच्या अल्सर विकारात आराम मिळतो, हाडे मजबूत होतात, ह्रदय निरोगी राहते, त्वचेसाठीही दही खाणे फायदेशीर आहे, ताण कमी होतो, ह्रदय निरोगी राहते, असे अनेक फायदे आहेत. दही विशिष्ट पदार्थांसोबत खाल्ले की त्या अन्नाची चव वाढते, हे खरे असले तरीही काही पदार्थ दह्यासोबत खाल्ल्याने आरोग्याची हानीही होऊ शकते. असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचे दह्यासोबत सेवन करू नये ?

दही आणि मासे
दही आणि मासे एकत्रितरित्या सेवन केल्याने अॅसिडिटी, पोटात गॅस होणे, अपचन यासारखे त्रास होऊ शकतात. याकरिता दही खात असाल तर त्यासोबत मासे खाणे टाळा. कारण या हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, पण ते एकाचवेळी खाल्ल्याचे आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. यामुळे त्वचाविकारही होऊ शकतात.

दही आणि आंबा
दही आणि आंबा या दोन्हींच्या चवीमध्ये पूर्णत: फरक आहे. आंबा उष्ण आहे आणि दही थंड आहे. यांचे एकत्रितरित्या सेवन केले तर त्वचेच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे दह्यासोबत आंब्याचे सेवन कधीही करू नये.

उडीद डाळ आणि दही
उडीद डाळ उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळे दह्यासोबत या डाळीच्या पदार्थांचे सेवन केल्यास शारीरिक त्रास होऊ शकतो. ज्यामुळे लूझ मोशन, गॅस, अॅसिडिटी असे त्रास होऊ शकतात.

दही आणि कांदा
दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने काही जणांना अॅलर्जी होऊ शकते. यामुळे उलटी होणे, अॅसिडिटी असे त्रास होऊ शकतात. दही थंड आणि कांदा पचनास उष्ण असल्याने दोन्ही पदार्थ एकाच वेळी खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा कांदा आणि दही एकत्रित खाल्ले जाते. प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी हे फायदेशीर आहे की नुकसानकारक हे पाहायला हवे.