मुंबईसाठी नवीन 268 एसी लोकल, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग

ac_local_train_

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत आधुनिकता आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा 3 आणि  3 अ अंतर्गत नवीन गाडय़ांची खरेदी करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 268 पूर्ण वातानुकूलित  गाडय़ांची  खरेदी होणार आहे. याशिवाय ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग  उभारण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या बैठकीत मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, नागपूर या शहरातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, नव्या  गाडय़ा मेट्रोप्रमाणेच बंद दरवाजाच्या, उच्च दर्जाच्या सोयीसुविधांनी सज्ज असतील. जुन्या विना-दरवाजाच्या गाड्यांना टप्प्याटप्प्याने हटवून त्याऐवजी या आधुनिक गाडय़ा सेवेत येतील. तिकीट दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

मेट्रो मार्गिका 11 प्रकल्पाला मान्यता

मुंबईत मेट्रो मार्गिका 11 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या  16 किलोमीटर लांबीच्या पूर्ण भूमिगत मार्गिकेची उभारणी करण्यात येणार आहे. जवळपास 24 हजार  कोटींच्या या प्रकल्पासाठी जपानच्या जायका कंपनीकडून निधी मिळणार आहे.

पुणेलोणावळा अतिरिक्त मार्गिका

आजच्या बैठकीत पुणेलोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुणे शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे मेट्रोच्या टप्पा 1 अंतर्गत बालाजीनगरबिबवेवाडी आणि  स्वारगेटकात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.