Corona – नगरमध्ये आणखी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह

517

नगरच्या आरोग्य विभागानं काही संशयित रुग्णांच्या घशाचे स्त्राव पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील 51 रुग्णांचे अहवाल मिळाले असून सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, तब्बल 45 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नव्या सहा करोन रुग्णांपैकी दोघे परदेशी नागरिक आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

दरम्यान, या आधी नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यापैकी 34 जण नगर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी 29 जण परदेशी नागरिक आहेत. या परदेशी नागरिकांपैकी 14 जणांची स्त्राव चाचणी अहवाल अद्यापपर्यंत आले असून दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत 434 जणांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यातील 308 जणांचे स्त्राव निगेटिव्ह तर 8 जणांचे स्त्राव पॉझिटिव्ह आले होते. या परदेशी ननागरिकांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले जात आहे. या परदेशी व्यक्तींना संगमनेर, राहुरी, जामखेड आणि नेवासा येथून ताब्यात घेण्यात आले होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयात जाऊन तेथे क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची व्यवस्था, अजून तपासणी साठी व्यक्तीची संख्या वाढली तर करावयाची उपाययोजना आदींबाबत त्यांची चर्चा केली. तसेच, याठिकाणी पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. बापूसाहेब गाढे, डॉ. घुगे आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या