दिल्लीत उभारले जातेय भव्य ‘सेना भवन’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भूमिपूजन

662

राजधानी दिल्लीतील कॅण्टोन्मेंट परिसरात हिंदुस्थानी लष्कराच्या मुख्यालयासाठी भव्य ‘सेना भवन’ उभारण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एका शानदार समारंभात सेना भवनाचे भूमिपूजन आज पार पाडले. सुमारे 12 लाख लष्करी जवानांसाठीच्या सेना भवनाची इमारत ‘पर्यावरणस्नेही’ (इको-फ्रेण्डली) असेल, असे सांगण्यात आले.

हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी नव्या ‘थल सेना भवन’ची माहिती दिली. या भवनामुळे लष्कराच्या सर्व मुख्यालयांची कार्यालये एका छताखाली येणार आहेत. त्यामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. या भवनामुळे जाण्या-येण्याचा वेळ कमी होऊन दिल्लीतील सैनिकांना आपल्या कुटुंबीयांना अधिक वेळ देता येणार आहे.

लष्कराची सध्याची ‘साऊथ ब्लॉक’ आणि ‘सेना भवन’ ही कार्यालये आहेत तशीच सुरू राहणार आहेत. प्रस्तावित ‘थल सेना भवन’ 39 एकर जमिनीवर उभारले जाणार आहे. त्यात सुमारे 7.5 लाख चौरस मीटर क्षेत्र कार्यालय संकुल आणि पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे.

पुढील पाच वर्षांत थल सेना भवनाची भव्य इमारत बांधली जाईल आणि त्यात लष्कराची सर्व कार्यालये समाविष्ट केली जातील, असे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले.

लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांसाठी एकूण 6014 कार्यालये
या भवनात 1684 लष्करी आणि नागरी अधिकाऱयांसाठी एकूण 6014 कार्यालये बांधण्यात येतील. यांत 4330 उपकर्मचाऱयांचा समावेश आहे. सेना भवन बांधकामामुळे किमान सुमारे दोन लाख तासांचे काम कुशल आणि अकुशल कर्मचाऱयांना उपलब्ध होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या