वसईतील नव्या पुलाने एमआयडीसीतील रहिवाशांची नाकाबंदी, शिवसेनेने उठवला आवाज

वसई पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पूल तोडून नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे काम करताना पूर्व बाजूस जाण्यासाठी रस्ताच न ठेवल्याने एमआयडीसी परिसरातील नोकरदार तसेच रहिवाशांना वळसा घालून इच्छितस्थळी ये-जा करावी लागत आहे. यामुळे हजारो नागरिकांची ‘नाकाबंदी’ होत असून याविरोधात शिवसेनेने आवाज उठवत पूर्वेकडील रहिवासी आणि कारखानदारांसाठी पूर्वीप्रमाणेच नवीन पुलावर पूर्व बाजूस उतरण्यासाठी मार्गिका ठेवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

खाडीवर असलेला हा नवीन पूल आधी महापालिका बांधणार होती, परंतु आता या पुलाचे काम मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन करत आहे. पूर्व बाजूस असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ उतरण्यासाठी जुन्या पुलावर एक मार्गिका होती. मात्र नवीन पुलाचे काम करताना आता पूर्वेकडे जाण्यासाठी मार्गिका ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्या पुलावरही जुन्या पद्धतीनेच पूर्व बाजूस उतरण्यासाठी मार्ग ठेवावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सचिव राजाराम बाबर यांनी रेल्वे कॉर्पोरेशनकडे केली आहे.

जुना पूल सात मीटर रुंद होता. तो आता ११ मीटर करण्यात आल्याने नरवीर चिमाजी आप्पांच्या स्मारकाच्या कामालाही बाधा येणार आहे. पूर्वेला पेट्रोलपंपाजवळच चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येणार असल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनाही द्रविडी प्राणायाम करावा लागत आहे.

फ्रान्सिस फर्नांडिस, उपाध्यक्ष, वसई इंडस्ट्रीयल असो.