
सामना प्रतिनिधी । खेड
खेड शिवतर मार्गावरील क्षेत्रपाल नगर येथील पुलाचे 26 जानेवारी रोजी लोकार्पण केले जाणार आहे. जुलै महिन्यापासून हा पुल दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीला बंद होता त्यामुळे या मार्गावरील अनेक गावातील ग्रामस्थांची दळण-वळणाच्या दृष्टीने गैरसोय झाली होती.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान ब्रिटीश कालीन पुलाचा काही भाग कोसळल्याने या मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. मात्र पर्यायी मार्ग अरुंद आणि धोकादायक असल्याने प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. दळण-वळणाच्या दृष्टीने होणारी गैरसोय लक्षात घेता नगरपालिका फंडातून पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते.
पुलाचे काम पुर्ण झाल्यावर गेल्या आठवड्यात युवा सेनेचे योगेश कदम यांनी हा पुल वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र पुलाचे लोकार्पण झालेले नव्हते. आता 26 जानेवारीला पुलाचे लोकार्पण केले जाणार असल्याचे नगरपालिका सुत्रांकडून सांगण्यात आले.



























































