केंद्राचा नवीन डोमिसाईल नियम; 15 वर्षांच्या वास्तव्यानंतर होता येणार कश्मीर, लडाखचा रहिवासी

807

जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून नव्याने असित्वात आलेल्या जम्मू-कश्मीर आणि लडाखचा रहिवासी होण्यासाठी या प्रदेशांबाहेरून आलेल्या सर्वसामान्यांना 15 वर्षे वाट पाहावी लागणार आहे. सर्वसामान्यांना 15 वर्षांचे वास्तव्य केल्यानंतरच या प्रदेशांचा रहिवासी होता येणार आहे. त्यानंतरच तिथे घर किंवा जमीन खरेदी करता येणार आहे. मात्र, उद्योगपतींना तिथे कोणता नवीन उद्योग सुरू करायचा असेल आणि व्यापाऱयांना नवीन व्यापार सुरू करायचा असेल तर त्यांना कोणत्याही अटींविना झटपट जमीन खरेदी करता येणार आहे.

केंद्र सरकारने या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांसाठी नवीन डोमिसाईल नियम तयार केले आहेत त्यात ही तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकार याबाबत अधिकृत परिपत्रक लवकरच प्रसिद्ध करणार आहे. केंद्र सरकार कलम 371 नुसार, जम्मू-कश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांना विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव आणणार असल्याचे म्हटले जात होते, मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने आज स्पष्ट करत जम्मू-कश्मीर आणि लडाखसाठी नवीन निवासी नियम बनवणार असल्याचे स्पष्ट केले.

विशेष दर्जा मिळणार नाही
जम्मू-कश्मीर आणि लडाखला कलम 371 नुसार विशेष दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असा आरोप काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी केला होता, मात्र काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स अशा प्रकारच्या अफवा पसरवत असून या प्रदेशांना विशेष दर्जा मिळणार नाही. अशा प्रकारची कोणतीही योजना नाही. कलम 370 आणि कलम 371 यांचा परस्पर कोणताही संबंध नाही असे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जीतेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.

असे असणार आहेत नवीन नियम
सर्वसामान्यांना 15 वर्षे वास्तव्यानंतर रहिवासी होता येणार.
प्रशासकीय सेवा परीक्षा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेता येणार.
व्यापारी, उद्योगपतींना कोणतीही अट नाही.
व्यापाऱयांना जमीन खरेदीसाठी आणि कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी झटपट परवानगी मिळणार.
प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी आणि त्यांच्या मुलांसाठी नवीन नियमांत सूट देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या