खोडकर नात्याची गोड गोष्ट ‘खारी बिस्कीट’, पहिलं गाणं प्रदर्शित

859

सामना ऑनलाईन । मुंबई

गेले काही दिवस सोशल मिडीयावर खारी बिस्कीट नावाचा एक चित्रपट येणार अशी चर्चा होती. ‘खारी बिस्कीट’ म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडला होता. त्याचं उत्तर मिळालं आहे. चित्रपटाचं नाव खारी बिस्कीट असलं तरी ते नेमकं काय प्रश्नाचं उत्तर मात्र गोड आहे.

खारी बिस्कीट ही आहे चिमुरड्या भावंडांची जोडगोळी. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. ही गोष्ट आहे ह्या दोघांची. पदरी गरिबी असली तरी तिच्या डोळ्यात कधीही पाणी आणू न देण्यासाठी, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या आणि तिला फुलासारखं जपणाऱ्या बिस्कीटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची. याचा प्रत्यय आपल्याला नुकत्याच रिलीज झालेल्या त्यांच्या गाण्यातून येतो. क्षितिज पटवर्धन यांचे शब्द आहेत. संगीतकार सुरज-धीरज या जोडीने संगीत दिले असून कुणाल गांजावाला यांनी स्वरबद्ध केलेले हे गाणं झी म्युझिकने श्रोत्यांसाठी आणलं आहे.

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील गाण्याची पत्रकार परिषद मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी चित्रपटातील कलाकारांची ओळख करून देण्यात आली. बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केलीय तर खारी साकारलीय वेदश्री खाडिलकर हिने. याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 27 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पाहा खारी बिस्कीटमधल्या गाण्याचा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या