लुंगी, चप्पल घालून वाहन चालवताय? वाचा काय म्हणाले गडकरी… 

देशात काही दिवसांपूर्वीच नवीन मोटार वाहतूक कायदा लागू झाला आहे. या नवीन मोटार वाहतूक कायद्यावरून देशभरात अनेक अफवा उडू लागल्या आहेत. हाफ शर्ट, लुंगी किंवा चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड आकारण्यात येईल, असे बोलले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती केली आहे. गडकरी यांनी ट्विट करून ही विनंती केली आहे.

गडकरी यांच्या कार्यालयीन ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये लिहिले आहे की, अफवांपासून सावध रहा..! नवीन मोटार वाहतूक कायद्यात हाफ शर्ट किंवा लुंगी, बनियान परिधान करून वाहन चालवल्यास कोणताही दंड आकारण्याची तरतूद नाही. तसेच वाहनाच्या मळलेल्या काचा, वाहनात अतिरिक्त बल्ब न ठेवणे किंवा चप्पल परिधान करून गाडी चालवण्यावर कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्याची तरतूद या नवीन मोटार वाहतूक कायद्यात नसल्याचेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवीन मोटर वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. याअंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारी दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. नवीन मोटार वाहन कायद्यात पूर्वीच्या तुलनेत दंड आकारण्याचे प्रमाण दहापटीने वाढविण्यात आले आहे. दरम्यान, काही राज्यात हा नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला असला तरी महाराष्ट्रात अद्याप हा कायदा लागू झालेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या