
सामना ऑनलाईन , मुंबई
सार्वजनिक गणेश मंडळात बाप्पाच्या आगमनास सुरुवात झाली आहे. मंडळं दरवर्षी प्रमाणेच यंदाही बाप्पाचं स्वागत अगदी दणक्यात करताना दिसत आहेत. पण यंदा बॉलिवूडची गाणी मंडपात वाजणार नाहीत. कारण मुंबईतील ११ हजार गणपती मंडळांचं नेतृत्व करणाऱ्या ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ने नवे नियम बनवले आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आता बॉलिवूडची गाणी वाजण्यास मनाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाचं एक वेगळं महत्व आहे. लोक भक्तीभावानं बाप्पाची पूजा-अर्चना करतात. अशा ठिकाणी बॉलिवूडच्या गाण्यांचं काय काम? असा सवाल या समितीने गणेश मंडळांना केला आहे.
अनेकदा या गणेश मंडळांच्या मंडपात बॉलिवुडची गाणी जोरजोरात वाजवली जातात. कधीकधीतर तरुण मंडळी या गाण्यांवर बीभत्स नृत्य करतात, धिंगाणा घालतात. हे योग्य दिसत नाही, हे लक्षात घेऊन गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि महत्व टिकेल असे नियम या समितीने तयार केले आहेत.
सावर्जनिक गणेशोत्सव मंडळांनी बॉलिवूडची गाणी मंडपात वाजवू नये. त्याऐवजी, भक्तीगीतं, भजन, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित करावे, असे आदेश देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष दहीबावकर यांनी सांगितले आहे. तसेच मंडळाने ध्वनी मापक अॅप डाउनलोड करून त्याद्वारे डेसिबलने तपासणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
सरकार बनवणार समिती :
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष एक समिती तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावात सरकारकडून एक पोलीस, एक मनपा सदस्य, एक अग्निशमन दल जवान, एक वाहतूक पोलीस, आणि एक समन्वय समिती सदस्याची मिळून समिती तयार करण्याची मागणी केली आहे.


























































