मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींसाठी 1 जानेवारीपासून नवी योजना

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींसाठी येत्या 1 जानेवारीपासून विशेष योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना लोढा म्हणाले, 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय संस्थांमध्ये अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आखण्यात आले आहेत. पहिल्याच टप्प्यात 55 हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेतला.
तसेच ‘मुख्यमंत्री स्वरोजगार योजना’ सुरू करण्यात आली असून, पहिल्या वर्षात 5 लाख बेरोजगारांना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 5 लाख विद्यार्थ्यांना 3 टक्के व्याजदराने 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. केवळ कर्जपुरवठाच नव्हे, तर प्रत्येक आयटीआयमध्ये इन्क्युबेशन सेंटर, मेंटरशिप ग्रुप उभारले जाणार असून, ऑनलाईन प्रश्न-उत्तरासाठी स्वतंत्र ऍपही तयार करण्यात आल्याची माहिती दिली.

400 कोटींची तरतूद

सध्याची योजना ही रोजगारासाठी नव्हे, तर प्रशिक्षणासाठी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असलेली योजना निवडणुकीनंतर बंद न करता पाच महिने वाढविण्यात आली. याशिवाय पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद आहे. अर्थसंकल्पातही 418 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे लोढा यांनी स्पष्ट केले.