
तुम्ही सतत ‘रील’ बघताय किंवा शॉर्ट व्हिडीओ बघताय, आणि त्यानंतर तुमचा मेंदू सुस्त, जड किंवा अस्वस्थ वाटतो का? नव्या या अभ्यासानुसार, सतत रील किंवा शॉर्ट व्हिडीओ पाहणे लक्ष, स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य कमकुवत करते. जेवढे जास्त आपण स्क्रोल करतो, तेवढीच आपल्या मेंदूची खोलवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. एका अभ्यासानुसार रिल्स मेंदूत जलद, नवीन आणि त्वरित आनंद देणाऱ्या उत्तेजनांचा पूर आणतात.
एक स्क्रोल अन् एक ‘किक’
रिल्स स्क्रोलिंग आणि मानसिक आरोग्य यांचे परस्परसंबंध सांगणरा अभ्यास नुकताच करण्यात आला.हा अभ्यास 98299 जणांवर करण्यात आला. त्यातील निष्कर्षानुसार, प्रत्येक वेळी आपण स्क्रोल करतो, तेव्हा एक छोटी ‘डोपामाईन किक’ मिळते. डोपामाईन हे तेच रसायन आहे जे आपल्याला चांगले वाटेल असे काम वारंवार करण्यास प्रवृत्त करते. या छोटय़ा-छोटय़ा आनंदाच्या लाटांनंतर, मेंदू तितक्याच वेगाने खाली येतो. आणि हेच तीव्रतेने खाली येणे थकवा, सुस्ती, मानसिक ताण निर्माण करतो.
‘बस एक व्हिडीओ आणखी…’
संशोधनात, मुले, किशोरवयीन आणि प्रौढ अशा तिन्ही वयोगटांवर याचा परिणाम जवळपास सारखाच आढळला. याचा अर्थ, ही ‘जेन-झी’ची समस्या नसून, ती प्रत्येक वयोगटातील समस्या आहे. सर्वाधिक नुकसान अशा लोकांमध्ये नोंदवले गेले जे स्वतःला प्रत्येक वेळी म्हणतात, ‘बस एक व्हिडीओ आणखी…’ आणि यात कित्येक तास जातात. यात लोक इच्छा असूनही स्क्रोल करणे थांबवू शकत नाहीत. हे धोकादायक असल्याचे तज्ञाचे मत आहे.
- अहवालानुसार, जास्त वेळ मोबाईलची स्क्रीन स्क्रोल करत राहणे झोपेची गुणवत्ता, मूड आणि मानसिक स्पष्टता बिघडविते. कमी झोप, चिंता आणि तणाव पुढे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अधिक कमकुवत करतात.
- जर तुमचे लक्ष केंद्रित होत नसेल, चिडचिडेपणा, स्क्रोल करणे थांबवण्यात अडचण येत असेल, झोप अनियमित असेल तर स्क्रोलिंगमधून ब्रेक घ्या. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा तुमच्या मेंदूचा स्पष्ट संकेत आहे की आता थोडी विश्रांती आवश्यक आहे.
























































