नवीन ठाणे स्थानकाला सरकारचा ग्रीन सिग्नल, मनोरुग्णालयाची जागा देण्यास मंजुरी

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणेकरांचे स्वप्न असलेल्या नव्या विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाच्या मार्गात येणारा भूखंडाचा अडथळा दूर करण्यास शिवसेनेला जबरदस्त यश आले आहे. या नवीन ठाणे स्थानकासाठी आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील मनोरुग्णालयालगतची जागा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नवीन ठाणे स्थानकाचे काम एक पाऊल पुढे सरकणार असून या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर मिळणार असून त्याद्वारे मनोरुग्णालयाचा पुनर्विकास होणार आहे.

ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरातील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून गेली अनेक वर्षे ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान मनोरुग्णालयालगतच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक बांधण्याची मागणी शिवसेना करत आहे. शिवसेना आणि महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने हा प्रकल्प करण्यास मान्यता दिली, मात्र ही जागा आरोग्य विभागाच्या मालकीची असल्यामुळे आजवर हा प्रकल्प पुढे सरकला नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाचे महत्त्व जाणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना सकारात्मक भूमिका घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी मनोरुग्णालयाची जागा देण्यास हिरवा कंदील दिला.

स्मार्ट उभारणी
ठाणे महापालिका या जागेच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देणार असून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी विस्तारित ठाणे स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच मनोरुग्णालयाचा विकास करणार आहे. यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास १चे प्रधान सचिव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि ठाणे महापालिका आयुक्तांची समिती स्थापन करण्याचा निर्णही घेण्यात आला आहे.

प्रकल्पाला गती येणार
मागील चार वर्षांपासून नवीन ठाणे स्थानाकाचा प्रकल्पाचे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. खासदार राजन विचारे यांचाही पाठपुरावा सुरू होता. तसेच ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पुढाकार घेऊन पालिकेच्या माध्यमातून अनेक सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत झाली. केवळ भूखंडाची अडचण होती तीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दूर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्याने या प्रकल्पाला गती येणार. – एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा पालकमंत्री