ICC T20 World Cup न्यूझीलंडची ‘सुपर एट’मध्ये एण्ट्री, कॅनडाच्या समराचे शतक व्यर्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वैयक्तिक शतकाची नोंद झाली. कॅनडाचा युवा सलामीवीर युवराज समराने 110 धावांची वादळी खेळी साकारली. मात्र, त्याचे हे शतक व्यर्थ ठरले. न्यूझीलंडने 16 व्या षटकातच आठ फलंदाज आणि 29 चेंडू राखून सहज विजयी लक्ष्य पार करीत ‘सुपर एट’मध्ये एण्ट्री केली.

कॅनडाकडून मिळालेले 174 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने 15.1 षटकांत केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात 176 धावा करीत पूर्ण केले. फिन अॅलन (21) आणि टिम सिफर्ट (6) यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करीत दोन षटकांत 29 धावा केल्या. मात्र डावखुरा फिरकीपटू साद बिन झफरने सिफर्टला बाद करीत कॅनडाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर डिलॉन हेयलिगरने अॅलनलाही माघारी धाडले. 2 बाद 30 अशी अवस्था झाल्यानंतर कॅनडाला आणखी दबाव निर्माण करण्याची आशा होती.

रचिन, फिलिप्स यांची अर्धशतके

रचिन रवींद्र (नाबाद 59) व ग्लेन फिलिप्स (नाबाद 76) यांनी तिसऱया विकेटसाठी 73 चेंडूंत 146 धावांची अभेद्य भागीदारी करीत कॅनडाचे स्वप्न भंगविले. ‘पॉवर प्ले’अखेर 60 धावांची लयलूट झाल्यानंतर रचिन-फिलिप्स जोडीने मधल्या षटकांतही आतषबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे दहाव्या षटकातच फलकावर धावांची ‘शंभरी’ लागली होती. फिलिप्सने अवघ्या 22 चेंडूंत अर्धशतक झळकावीत टी-20 विश्वचषकातील न्यूझीलंडचा सर्वांत जलद अर्धशतकवीर होण्याचा मान पटकाविला. 12 व्या षटकात दोघांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. 15 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रचिनने षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले.

समराचे झुंजार शतक व्यर्थ

त्याआधी कॅनडाने 4 बाद 173 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. 19 वर्षीय युवराज समराने झुंजार शतकी खेळी करीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. त्याने दिलप्रीत बाजवासह 116 धावांची सलामी दिली. त्याने 58 चेंडूंत शतक पूर्ण करताना टी-20 विश्वचषकातील सर्वांत युवा शतकवीराचा मान मिळवला.