टीम इंडियाचा बढे चलोचा निर्धार, न्यूझीलंड विरुद्धची दुसरी टी-20 आज

695

हिंदुस्थान-न्यूझीलंड हे दोन तुल्यबळ संघ दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात रविवारी पुन्हा ऑकलण्डमधील ईडन पार्कवरच भिडणार आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या ‘टीम इंडिया’ने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विराट सेनेने विजयी सलामी दिली असली तरी उद्याच्या लढतीत गोलंदाजीमध्ये एखादा बदल होण्याची शक्यता आहे. ‘टीम इंडिया’ सलग दुसऱया विजयासह आघाडी वाढविण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल, तर यजमान न्यूझीलंड फिट्टमफाटसाठी सर्वस्व पणाला लावतील यात शंकाच नाही.

ईडन पार्कच्या छोटय़ा मैदानावर सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. दोन्ही संघांमध्ये केवळ जसप्रीत बुमराह यानेच आठहून कमी सरासरीने धावा दिल्या. मोहम्मद शमीने 4 षटकांत 53, तर शार्दुल ठाकूरने 3 षटकांत 44 धावा दिल्या. त्यामुळे ठाकूरला बाकावर बसवून नवदीप सैनी किंवा कुलदीप यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजाकडून अधिक धावा जाण्याची अधिक शक्यता असल्याने सैनीऐवजी कुलदीपला संधी मिळू शकते. सलामीच्या लढतीत युझवेंद्र चहल व रवींद्र जाडेजा या फिरकीच्या जोडगोळीने धावगती रोखली होती. त्यामुळे तिसरा फिरकीपटू कुलदीपला अंतिम अकरामध्ये खेळविण्याचा विचार होऊ शकतो.

नव्या दमाच्या खेळाडूंवर भिस्त
लोकेश राहुल व श्रेयस अय्यर या नव्या दमाच्या खेळाडूंनी सलामीच्या लढतीत ‘टीम इंडिया’ला सहज विजय मिळवून दिला. या दोघांनंतर मनीष पांडे व शिवम दुबे यांनीही विजय हातातून निसटणार नाही याची काळजी घेतल्याने कर्णधार विराट कोहली जाम खुश झाला आहे. खोलवर फलंदाजी ही हिंदुस्थानची ताकद असून, युवा शिलेदारांवरच संघाची खरी भिस्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या