नेवासा – नगरपंचायतीवर ‘क्रांतिकारी’चा झेंडा फडकला, भाजप सत्तेतून हद्दपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ‘क्रांतिकारी’च्या योगिता सतीश पिंपळे तर उपनगराध्यक्षपदी नंदकुमार पाटील निवडून आले आहेत. नगरपंचायतीच्या सत्तेतून भाजप पूर्णपणे हद्दपार झाल्याचे दिसत असून आमदार शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली ‘क्रांतिकारी’चे निर्णायक वर्चस्व निर्माण झाले आहे. आमदार गडाख शिवसेनेचे सहयोगी सदस्य असल्याने नेवाशात भगवा झेंडा फडकला आहे .

यापूर्वी नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव होते. नगरपंचायत निवडणुकीत ‘क्रांतिकारी’चे बहुमत होऊनही या प्रवर्गाची जागा निवडून न आल्याने त्यांना या पदापासून वंचित राहावे लागले. तर विरोधी भाजपच्या जागा कमी निवडून येऊनही त्यांच्याकडे या प्रवर्गाची नगरसेविका निवडून आलेली असल्याने नगराध्यक्षपद अलगद त्यांच्याकडे गेले होते.

नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या पदाचे आरक्षण बदलून खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले. त्यानंतर नगरपंचायतीत ‘क्रांतिकारी’ राज येण्याची स्पष्ट चिन्हे दिसत असतानाच या पक्षाच्या प्रभाग 13 मधील नगरसेविका फिरोजबी पठाण यांचे पद अतिक्रमनाच्या मुद्यावरून रद्दबातल ठरविण्यात विरोधकांना यश आले. यामुळे या नगरपंचायतीत क्रांतिकारीचे 8 व भाजपचे 8 असे समान पक्षीय बलाबल निर्माण होऊन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली होती. या पदांच्या निवडीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी अनुक्रमे क्रांतिकारी कडून योगिता सतीश पिंपळे व नंदकुमार पाटील तर भाजप आघाडीकडून शालिनी संजय सुखधान व रणजित दत्तात्रय सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी ‘क्रांतिकारी’चे सर्व नऊ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. याउलट भाजपच्या नगरसेवकांचे संख्याबळ 8 असताना यावेळी केवळ 7 नगरसेवक उपस्थित होते. प्रभाग 4 मधील भाजप नगरसेविका अनिता भारत डोकडे यावेळी अनुपस्थित राहिल्या. हात उंचावून यावेळी मतदान घेण्यात आले. क्रांतिकारीच्या पिंपळे व पाटील यांना 9 नगरसेवकांचे तर भाजपच्या सुखदान व सोनवणे यांना 7 नगरसेवकांचे समर्थन मिळाले. त्यामुळे नगराध्यक्षपदी योगिता पिंपळे व उपनगराध्यक्षपदी नंदकुमार पाटील यांची 9 विरुद्ध 7 मतांनी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.