
शिवडी येथे ‘सेलिस्टिया पार्ंकग’ समोरचा दोन महिन्यांपूर्वी तयार झालेला सिमेंट काँक्रीटीकरणाचा रस्ता पुन्हा खोदण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऐन पावसाळ्यात रस्ता खोदल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या खोदकामाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱयांवर कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला 2024 मध्ये मंजुरी मिळाली होती. तेव्हापासून दोन वर्षे रस्त्याचे काम सुरू होते. जेव्हा एखाद्या मोठय़ा रस्त्याचे काम सुरू होते तेव्हा संबंधित सर्व युटिलिटी पंपन्यांना रस्ता काम सुरू होणार असल्याचे पूर्वसूचना पत्र दिले जाते. टाटा पंपनीलाही असे पत्र देण्यात आले होते. या रस्त्याचे काम फेब्रुवारी-मार्च 2026 पर्यंत पूर्ण झाले होते. मात्र, रस्ता पूर्ण होऊन अवघे दोन महिने होत नाहीत तोच, जून 2026 मध्ये काहीतरी त्रुटी असल्याचे कारण पुढे करून रस्ते विभागाने त्याच रस्त्यावर पुन्हा खोदकाम करण्याची परवानगी दिली.






























































