पुढच्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना 24 सुट्ट्या, शनिवार, रविवारमुळे चार सुट्टय़ा बुडाल्या

राज्य सरकारने 2023 या वर्षासाठी सार्वजनिक सुट्टय़ा आज जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण 24 सुट्टय़ा मिळाल्या आहेत, मात्र त्यामधील चार सुट्टय़ा शनिवार आणि रविवार आल्यामुळे बुडाल्या आहेत.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, महाशिवरात्री 18 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी, होळी (रंगपंचमी) 7 मार्च, गुढीपाडवा 22 मार्च, रामनवमी 30 मार्च, महावीर जयंती 4 एप्रिल, गुड फ्रायडे 7 एप्रिल, ‘भारतरत्न’ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल, महाराष्ट्र दिन 1 मे, बुद्ध पौर्णिमा 5 मे, बकरी ईद 28 जून, मोहरम 29 जुलै, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, पारसी नववर्ष दिन 16 ऑगस्ट, गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर, ईद ई मिलाद 28 सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती ऑक्टोबर 2, दसरा 24 ऑक्टोबर, दिवाळी लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर, गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर, ख्रिसमस 25 डिसेंबर अशा मिळून 24 सार्वजनिक सुट्टय़ा सरकारने जाहीर केल्या आहेत.

मात्र महाशिवरात्री, रमजान ईद आणि मोहरम हे सण शनिवारी तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि दिवाळी लक्ष्मीपूजन रविवार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या हक्काच्या चार सुट्टय़ा बुडाल्या आहेत. हल्ली राज्य सरकारी कर्मचाऱयांसाठी पाच दिवसांचा आठवडा आहे.

एका वर्षात 165 सुट्टय़ा

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ांवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेत भाग घेताना नाराजी व्यक्त केली होती. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात 165 सुट्टय़ा मिळतात. वर्षातले सहा महिनेच कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱयांच्या सुट्टय़ांचा गांभीर्याने विचार करा, अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारी सुट्टय़ांवर नाराजी व्यक्त केली.