15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास, टोल प्लाझावर सतत रिचार्ज करण्याची कटकट थांबणार

राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱया वाहनचालकांना येत्या 15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार आहे. टोल प्लाझावर फास्टॅग सतत रिचार्ज करण्यासाठी वाहनचालकांची मोठी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ही सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे.

देशभरातील बहुतांश महामार्गांवर जागोजागी टोलवसुली सुरू आहे. हा टोलचा भुर्दंड सोसतानाच वाहनचालकांना वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. टोल प्लाझावर फास्टॅग सतत रिचार्ज करावा लागतो. या त्रासातून वाहनचालकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शुक्रवार, 15 ऑगस्टपासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू करणार आहे. हा पास राष्ट्रीय महामार्ग व एक्सप्रेस वेवरील प्रवासासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी फास्टॅग नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वेवरच वार्षिक पास लागू असेल. त्यात मुंबई-रत्नागिरी, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे, मुंबई-नाशिक, मुंबई-सुरत या मार्गांचा समावेश असेल. कार, जीप, व्हॅनसाठी हा वार्षिक पास असून व्यावसायिक वाहनांसाठी लागू होणार नाही. तसेच राज्य महामार्ग किंवा महापालिकेच्या टोल मार्गावर हा वार्षिक पास चालणार नाही. अशा मार्गांवर फास्टॅग सामान्य पद्धतीने काम करणार आहे.

3 हजार रुपयांमध्ये वर्षभरात 200 फेऱ्या

सध्या टोल नाक्यांवर वाहनांच्या वजनानुसार वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे. त्यानुसार 200 टोलनाक्यांवरून जाण्यासाठी जवळपास 10 हजार रुपये मोजावे लागत आहेत. वार्षिक पासच्या नव्या योजनेनुसार एक टोल क्रॉस करण्यासाठी 15 रुपये शुल्क आकारण्यात येईल. वाहनचालक 3 हजार रुपयांमध्ये वर्षभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या महामार्गांवरुन 200 फेऱया मारू शकणार आहेत. शुक्रवारपासून प्राधिकरणाचे संकेतस्थळ आणि अॅपवरून वार्षिक पास उपलब्ध होणार आहे.

फास्टॅग वार्षिक पासची वैशिष्ट्ये

  • एकदा 3 हजार रुपयांचा फास्टॅग वार्षिक पास काढला की पुढे वर्षभर पुन्हा टोल भरण्याची आवश्यकता नाही.
  • राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वेवरील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग पास वैध असेल.
  • वार्षिक पासमुळे वाहनचालकांचा वेळ वाचेल. तसेच इंधनाची बचत होणार आहे. टोल प्लाझावरील रांगा, गर्दीतून वाहनचालकांची सुटका होईल.
  • 60 किमीच्या आत प्रवास करणाऱया वाहनचालकांना वारंवार टोल भरावा लागणार नाही.