इसिसचे पुण्यात कनेक्शन; जिमचालक आणि पत्रकारितेच्या विद्यार्थिनीकडून घातपाताचा कट उघडकीस

पुणे-हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया घडविण्याचा कट पुण्यातून अटक केलेल्या दोघांनी केला असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणावरुन काल राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) येरवडा आणि कोंढव्यातून महिलेसह दोघांना अटक केले होते. नबील एस खत्री (वय 27, रा. कोंढवा ) आणि सादिया अन्वर शेख (वय 22, रा. फुलेनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, नबील खत्री पुण्यात व्यायामशाळा चालवित होता. तर सदिया शेख बारामती येथे एका महाविद्यालयात मास कम्युनिकेशन्स अँड जर्नालिझमच्या द्वितीय वर्षांत शिक्षण घेत आहे. इसिसच्या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या आयएसकेपीशी संबंध असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी 8 मार्चला कश्मिरी दाम्पत्याला अटक केली होती. जहांजईझीब सामी वानी आणि त्यांची पत्नी हिना बशीर बेग अशी त्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य विध्वंसक आणि देशविरोधी कार्यात सहभागी असल्याचे एनआयएला आढळून आले. त्याशिवाय आयएसआयएस अबू दाभी मॉडयूल प्रकरणी तिहार तुरूंगात कैदी असलेला अब्दुल्ला बासिथ याच्याशी त्यांचा संपर्क असल्याचेही निष्पन्न झाले होते.

आरोपी सादिया शेख हे जहांझीब सामी, हिना बशीर बेग आणि अब्दुल्ला बासिथ यांच्याशी सतत संपर्क साधत असल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय आयएसआयएसच्या विचारधारेचा प्रचार कसा करायचा, हिंदुस्थानातील दहशतवादी कारवाया कशारितीने वाढवायच्या, दहशतवादी कारवायांसाठीr तरुणांची भरती करून हिंदुस्थानात इसिसची केडर उभारण्याचा प्रयत्न करीत होते. त्याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून सादिया इसिसची भरती करणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत असताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी 2018 मध्ये ताब्यात घेतले होते. आरोपी नबील खत्री जहानजेब सामी आणि अब्दुल्ला बासिथ यांना शस्त्रे खरेदी, बनावट सिमकार्ड मिळविण्याची व्यवस्था करून हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करण्याच्या योजनेत सक्रियपणे सहभागी असल्याचेही समोर आले आहे. आयएसआयएसच्या हिंदुस्थानातील कारवायांना पुढे आणण्यासाठी सुधारित स्फोटक उपकरण आणि वेगवेगळ्या सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर ते जहानजेबशी सतत संपर्कात होते. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना एनआयए स्पेशल कोर्ट, नवी दिल्ली येथे हजर केले जाणार असल्याचे एनआयने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या